काही दिवसांपूर्वी इरफान पठाण आणि सुरेश रैना या खेळाडूंनी सोशल मीडियावर गप्पा मारताना, बीसीसीआयने भारतीय खेळाडूंना परदेशी टी-२० लिगमध्ये खेळण्याची परवानगी द्यावी हा मुद्दा चर्चेला आणला होता. यावरुन नंतर अनेक मतमतांतर पुढे आली. या खेळाडूंच्या यादीत आता रॉबिन उथप्पाचं नावही दाखल झालेलं आहे. बीसीसीआय आपल्या खेळाडूंना बिग बॅश लिग, कॅरेबिअन प्रमिअर लिग, टी-२० ब्लास, सुपर स्मॅश, बांगलादेश प्रिमीअर लिग अशा कोणत्याही टी-२० लिगमध्ये खेळण्याची परवानगी देत नाही. भारतीय खेळाडूंना या स्पर्धेत खेळायचं असल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारावी लागते.

“कृपा करुन आम्हाला परदेशी टी-२० लिगमध्ये खेळण्याची परवानगी बीसीसीआयने द्यावी. ज्यावेळी संधी असूनही तुम्हाला बाहेर जाता येत नाही त्यावेळी दुःख होतं. प्रत्येक देशातील खेळाडूंसोबत विविध वातावरणात खेळतानाचा अनुभव हा क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला उपयोगात येतो. सध्या सौरव गांगुलीकडे बीसीसीआयचं नेतृत्व आहे. तो खूप पुढारलेल्या विचारांचा आहे. गांगुलीमुळे भारतीय क्रिकेट हे वेगळ्या स्तरावर पोहचलं आहे. मला आशा आहे की तो कधीतरी या मुद्द्याकडे लक्ष देईल.” रॉबिन BBC शी बोलत होता.

रॉबिन उथप्पा हा टी-२० क्रिकेटमधला अनुभवी खेळाडू म्हणून ओळखला जातो. दरम्यान बीसीसीआयने करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आयपीएलचा तेरावा हंगाम अनिश्चीत काळासाठी स्थगित केला आहे. ही स्पर्धा रद्द झाल्यास बीसीसीआयला ४ हजार कोटींचं नुकसान होणार आहे. त्यामुळे बीसीसीआय ही स्पर्धा वर्षाअखेरीस आयोजित करता येणं शक्य आहे का याची चाचपणी करत आहे.