पाकिस्तानमधील राजकीय परिस्थिती तणावग्रस्त असल्यामुळे या महिन्याअखेरीस इस्लामाबाद येथे होणाऱ्या डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेतील लढतीसाठी रोहित राजपाल हा भारताचा न खेळणारा कर्णधार असणार आहे. त्यामुळे महेश भूपती पर्वाची अखेर झाल्याचे संकेत या निवडीतून मिळत आहेत.

कर्णधार महेश भूपतीसह अनेक अव्वल खेळाडूंनी २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या या लढतीतून माघार घेतली आहे. ‘‘राष्ट्रीय सेवेसाठी महेश भूपतीने नकार दिल्यामुळे भविष्यात कर्णधारपदाच्या भूमिकेसाठी त्याचा विचार करण्यात येणार नाही. त्याची कारकीर्द आता संपल्यात जमा आहे. त्यामुळे पेसने निवृत्ती घेतल्यानतंर त्याचा या भूमिकेसाठी विचार करण्यात येईल,’’ असे एआयटीएच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.