सचिन तेंडुलकर हा मैदानावरील व मैदानाबाहेरीलही एक अद्वितीय क्रिकेटपटू आहे, असे श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्या याने सचिनच्या निवृत्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.
जयसूर्या म्हणाला, सचिनच्या कारकीर्दीबाबत कौतुक करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. आमच्याविरुद्ध खेळताना आम्ही एकमेकांशी अनेक वेळा संवाद साधला आहे. तसेच मुंबई इंडियन्स संघाकडून त्याच्या साथीत खेळताना त्याच्या स्वभावाच्या अनेक पैलूंचे दर्शन मला झाले आहे. प्रतिस्पर्धी व सहकारी खेळाडू अशा दोन्ही नात्यांमध्ये मला अतिशय चांगला अनुभव आला आहे. सचिन हा अतिशय अव्वल दर्जाचा व कलात्मक शैली लाभलेला फलंदाज आहे.  जगात सर्वोच्च कीर्तिमान लाभलेला हा विनम्र व अत्यंत साधी विचारसरणी लाभलेला खेळाडू आहे. त्याने विजय व पराजय या दोन्ही गोष्टी समान विचाराने घेतल्या असल्यामुळेच तो महान क्रिकेटपटू आहे. निवृत्ती स्वीकारण्याचा त्याचा निर्णय त्याने अतिशय विचारपूर्वक घेतला असावा असेही जयसूर्या याने सांगितले.