इंग्लिश दौऱ्याच्या ‘मध्यंतरा’ला आता पाकिस्तानचा संघ भारताशी मर्यादित षटकांची मालिका खेळणार आहे. भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पध्र्यामधील ही मैदानावरील चुरस पाहण्यासाठी क्रिकेटरसिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही आपण पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी आपण उपलब्ध असल्याचे बीसीसीआयला कळविल्यामुळे या स्पध्रेची लज्जत आणखीन वाढली आहे. मोजक्या एकदिवसीय मालिका आणि स्पर्धामध्ये खेळणारा सचिन एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करणार असल्याची चर्चा होती, पण सचिनने आपली उपलब्धता स्पष्ट करून या अफवांना मूठमाती दिली आहे.
दोन ट्वेन्टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्याकरिता राष्ट्रीय निवड समितीची बैठक रविवारी मुंबईत होणार आहे. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली निवड समिती कोणते महत्त्वपूर्ण बदल करणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत सचिनला १८.६६च्या सरासरीने ११२ धावा काढता आल्या होत्या. त्यामुळे ३९ वर्षीय सचिनवर प्रसारमाध्यमे आणि माजी क्रिकेटपटूंनी जोरदार टीका केली, पण या वर्षी ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ बँक सीरिज आणि आशिया चषक अशा दोनच एकदिवसीय स्पर्धा खेळणाऱ्या सचिनने पाकिस्तान आणि इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आपण उपलब्ध असल्याचे कळविले आहे, असे सूत्रांकडून समजते. आशिया चषक क्रिकेट स्पध्रेत बांगलादेशविरुद्ध सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीमधील १००वे शतक साजरे केले होते.
निवड समितीच्या बैठकीमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या कर्णधारपदाबाबतही गांभीर्याने चर्चा होण्याची शक्यता आहे. पण मागील वर्षी भारताला विश्वचषक जिंकून देण्याची किमया साधणारा धोनी आपले कर्णधारपद टिकविण्यात यशस्वी होईल, असा जाणकारांचा अंदाज आहे. सध्या फिटनेस आणि फॉर्म या दोन्हीशी झुंजणारा वेगवान गोलंदाज झहीर खानच्या निवडीबाबतही साशंका व्यक्त करण्यात येत आहे. सध्या झहीर मुंबईसाठी मध्य प्रदेशविरुद्ध रणजी करंडक सामना खेळत आहे. याचप्रमाणे इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत न खेळणाऱ्या वीरेंद्र सेहवागच्या उपलब्धतेविषयी अद्याप समजू शकलेले नाही. मात्र पाकिस्तानसारख्या प्रतिस्पध्र्याविरुद्ध सेहवाग निश्चितपणे खेळणार, असे सूत्रांकडून समजते.भारताच्या एकदिवसीय संघात अष्टपैलू युवराज सिंग आणि रवींद्र जडेजा आपले पुनरागमन करेल, तर सुरेश रैना आणि रोहित शर्मा यांचेही संघात स्थान असू शकेल. त्यामुळे मुंबईचा फलंदाज अजिंक्य रहाणेचा समावेश नशिबावर अवलंबून असेल. ऑफ-स्पिनर आर. अश्विन आणि डावखुऱ्या पीयूष चावला भारताच्या फिरकीची धुरा वाहतील. मात्र प्रग्यान ओझाचा संघात समावेश झाल्यास भारताला एक फलंदाज कमी खेळवता येईल. तीन वेगवान गोलंदाजांचे स्थान निश्चित करताना अशोक दिंडाचा समावेश निश्चित मानला जात आहे. उमेश यादवच्या दुखापतीबाबत अद्याप स्पष्टीकरण झालेले नाही.  अष्टपैलू इरफान पठाणचीही वर्णी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, मात्र त्यासाठी सर्वात आधी झहीरचा फैसला होईल. दरम्यान, इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेतील भारतीय संघाच्या कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी बहुतांशी तोच संघ कायम राखण्यात येईल.