गतविजेती सायना नेहवाल व महाराष्ट्राची उदयोन्मुख खेळाडू अरुंधती पानतावणे यांनी थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत उप-उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. पण पी.सी.तुलसी हिला मात्र पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सायनाने चीन तैपेईच्या शिहहान हुआंग हिच्यावर २१-११, २१-१६ अशी सरळ दोन गेम्समध्ये मात केली. हैदराबादच्या २३ वर्षीय सायना हिला पुढच्या फेरीत इंडोनेशियाच्या फेबी अंगुनी हिच्याशी खेळावे लागणार आहे.
 नागपूरच्या अरुंधती हिला कोरियन खेळाडू मिनजेई ली हिच्याविरुद्ध झगडावे लागले. ४५ मिनिटे चाललेला हा सामना तिने १४-२१, २१-९, २१-१५ असा जिंकला. पी. सी. तुलसी या उदयोन्मुख खेळाडूला थायलंडच्या पोर्नतिप बुरानाप्रसातेर्क हिच्याविरुद्ध २१-१४, २१-१७ असा पराभव स्वीकारावा लागला.
पुरुषांच्या गटात बी.साईप्रणित याने २००३ चा ऑल इंग्लंड विजेता महंमद हफीझ हाशिमवर २१-१२, ९-२१, २२-२० अशी मात केली. पाचव्या मानांकित अजय जयराम याने इंडोनेशियाच्या शिसार हिरेन रुस्ताव्हितो याच्यावर २१-११, १९-२१, २१-९ अशी मात केली. एच.एस.प्रणय याने आव्हान राखताना स्थानिक खेळाडू नोनपाकोर्न नान्ताथिरो याला २१-११, २१-१९ असे पराभूत केले. दहावा मानांकित आनंद पवार याने विजयी सुरुवात करताना इंडोनेशियाच्या रियान्तो सुबागजा याचा २१-१५, ९-२१, २१-१४ असा पराभव केला.  सौरभ वर्मा याने खोसित फेप्रदोब याचे आव्हान २१-१६, २१-१८ असे संपुष्टात आणले. के.श्रीकांत याने हियुक जिनजिऑन याचा २१-१७, २१-१२ असा पराभव केला.