इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सायना नेहवालने अत्यंत दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. मात्र पी.व्ही. सिंधू आणि किदम्बी श्रीकांत उपांत्यपूर्व फेरीतच स्पर्धेतून बाद झाले आहेत.

मलेशिया मास्टर्सप्रमाणे सायनाने या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व सामन्यातही सहज विजय मिळवला. सायनाने थायलंडच्या पॉर्नपावी चोचुवोंगला २१-७, २१-१८ असे पराभूत केले. सायनाने सामन्यातील पहिल्याच गेममध्ये ११-४ अशी भक्कम विजयी आघाडी घेत कूच केले. संपूर्ण सामन्यात सायनाने वर्चस्व गाजवले. पहिला गेम तर अत्यंत आरामात आणि दुसऱ्या गेममध्ये चोचुवोंगने ८-४ अशी आघाडी घेतली होती. मात्र त्यानंतर सायनाने पुन्हा १२-१२ अशी बरोबरी गाठत तिचा प्रतिकार मोडून काढला आणि उपांत्य फेरी गाठली. सायनाला आता पुढील फेरीत ही बिंगजिओ आणि चेन शिओझीन या दोन्ही चिनी खेळाडूंमधील विजेत्याशी झुंजावे लागणार आहे. सिंधूला कॅरालिन मरिनने पुन्हा एकदा पराभूत करीत तिची वाटचाल खंडित केली. मरिनने हा सामना २१-११, २१-१२ असा जिंकला. मरिनच्या वेगाशी बरोबरी साधण्यात सिंधू कमी पडली.

यजमान इंडोनेशियाच्या जोनाथन ख्रिस्तीने श्रीकांतला २१-१८, २१-१९ असे नमवले. पहिल्या गेममध्ये श्रीकांतने केलेल्या आक्रमणाला समर्थपणे तोंड देत जोनाथनने ११-७ अशी आघाडी घेतली. श्रीकांतने त्यानंतर पुन्हा आक्रमणाची धार वाढवत जोनाथनला १५-१५ असे गाठले. स्मॅशचे बहारदार फटके मारत श्रीकांतने १७-१६ अशी आघाडीदेखील घेतली. मात्र श्रीकांतने त्यानंतर अनेकदा टाळत्या येण्याजोग्या चुका केल्याने पहिला गेम गमावला. दुसऱ्या गेममध्ये पुन्हा जोनाथननने ६-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर जोनाथनने ही आघाडी ११-४ अशी वाढवत नेली. त्यानंतर श्रीकांतने काही झटपट गुण मिळवत ही आघाडी १६-१४ अशी कमी केली. मात्र, अखेरच्या टप्प्यात जोनाथनने स्मॅशवर दोन गुण मिळवत सामना जिंकून उपांत्य फेरीत धडक मारली आहे.