बँकॉक : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिला सलग दुसऱ्यांदा पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या सलामीलाच डेन्मार्कच्या लिने होमार्क जार्सफेल्ड हिने सायनाचे आव्हान संपुष्टात आणले. बुधवारी भारताच्या चार बॅडमिंटनपटूंना पराभवाचा धक्का सहन करावा लागल्याने या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले.

पाचव्या मानांकित सायनाला बिगरमानांकित होमार्क जार्सफेल्ड हिने ४७ मिनिटे रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत १३-२१, २१-१७, १५-२१ असे पराभूत केले. सायनाला गेल्या आठवडय़ात इंडोनेशिया मास्टर्स स्पर्धेतही पहिल्या फेरीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते.

पुरुषांमध्ये किदम्बी श्रीकांत, समीर वर्मा आणि एचएस. प्रणॉय यांनाही पहिल्या फेरीचा अडथळा पार करण्यात अपयश आले. त्यामुळे भारतीय बॅडमिंटनपटूची सुमार कामगिरीची परंपरा सुरूच आहे. समीर वर्मा याला मलेशियाच्या ली झि जिया याने १६-२१, १५-२१ असे हरवले.

पाचव्या मानांकित श्रीकांतवर इंडोनेशियाच्या शेसार हिरेन हुस्ताविटो याने ४८ मिनिटे चाललेल्या उत्कंठावर्धक लढतीत २१-१२, १४-२१, १२-२१ असा विजय साकारला. प्रणॉय याला मलेशियाच्या लिऊ डॅरेन याने १७-२१, २२-२०, १९-२१ असे पराभूत केले.