सायना नेहवालने ऑस्ट्रेलियन सुपर सीरिज बॅडिमटन स्पर्धेचे जेतेपद राखण्याच्या दिशेने आणखी एक दमदार पाऊल टाकले आहे. सायनाने विजयासह उपांत्यपूर्व फेरीत स्थान पटकावले आहे. मात्र भारताच्या किदम्बी श्रीकांत आणि ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीला पराभवाला सामोरे जावे लागल्याने सायना या स्पर्धेतील भारताची एकमेव प्रतिनिधी आहे.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असल्याने सायनाने क्रमवारीत ९व्या स्थानी असलेल्या चीनच्या सन यु हिच्यावर २१-१९, १९-२१, २१-१४ अशी मात केली. ऑलिम्पिक पदकविजेत्या सायनाची पुढच्या फेरीत चीनच्या सिझियान वांगशी लढत होणार आहे. वांगविरुद्ध सायनाची कामगिरी ६-५ अशी आहे.
सनविरुद्धच्या शेवटच्या चारपैकी तीन लढतीत विजय मिळवणाऱ्या सायनाने या सामन्यात पहिल्या गेममध्ये ११-६ अशी आघाडी घेतली. सनने चिवटपणे झुंज देत १८-१८ अशी बरोबरी केली. पण यानंतर जिद्दीने खेळ करीत सायनाने पहिला गेम नावावर केला.
दुसऱ्या गेममध्ये सायनाकडे १३-७ अशी भक्कम आघाडी होती. मात्र सनने हळूहळू वाटचाल करीत १३-१३ अशी बरोबरी केली. सायनाने स्मॅश, क्रॉसकोर्ट आणि नेटजवळून सुरेख खेळ करीत १८-१५ अशी आगेकूच केली. पण झुंजार खेळ करून सनने उर्वरित गुणांची कमाई केलीआणि दुसरा गेमही जिंकला.
तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये सावधपणे खेळणाऱ्या सायनाने १२-४ अशी दमदार आघाडी घेतली. सनने प्रतिकार करीत परतण्याचा प्रयत्न केला मात्र तो अपुराच ठरला.
पुरुषांमध्ये चीनच्या तिआन हौउवेईने किदम्बी श्रीकांतवर १८-२१, २१-१७, २१-१३ असा विजय मिळवला. महिला दुहेरीत इंडोनेशियाच्या नित्या क्रिशिंदा महेश्वरी आणि ग्रेसिया पोली जोडीने ज्वाला आणि अश्विनीला २१-१४, २१-१० असे नमवले.