जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी विराजमान झालेल्या सायना नेहवालने मलेशिया सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत दमदार वाटचाल कायम राखत उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. सायना झंझावाती फॉर्ममध्ये असताना पुरुषांमध्ये एच. एस. प्रणॉय, पारुपल्ली कश्यप यांच्यासह महिला दुहेरीत ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा यांना पराभवाला सामोरे जावे
लागले.
काही दिवसांपूर्वीच भारतीय खुल्या स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या सायनाने १५ व्या मानांकित याओ झ्यूवर २१-१३, २१-९ असा विजय मिळवला. ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाने सुरेख पदलालित्य आणि वैविध्यपूर्ण फटक्यांच्या जोरावर हा विजय साकारला. पहिल्या गेममध्ये सायनाने सातत्याने गुण पटकावत हा गेम नावावर केला. दुसऱ्या गेममध्ये ३-३ अशी बरोबरी होती. मात्र यानंतर सायनाने नियमितपणे गुणांची कमाई करीत दुसऱ्या गेमसह सामना जिंकला. पुढच्या फेरीत सायनाची लढत सन यूशी होणार आहे.
पुरुषांमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या चीनच्या चेन लाँगने पारुपल्ली कश्यपचा २१-१०, २१-१४ असा धुव्वा उडवला.  
चीनच्या तिआन होऊवेईने किदम्बी श्रीकांतवर २१-१४, २१-१८ असा विजय मिळवला.  सार्वकालीन महान खेळाडू लिन डॅनने प्रणॉयला २१-१५, २१-१४ असे  नमवले.  इंडोनेशियाच्या नित्या क्रिशिंदा माहेश्वरी आणि
ग्रेसिया पोली जोडीने ज्वाला गट्टा आणि अश्विनी पोनप्पा जोडीवर २१-२३, २१-८, २१-१७ अशी मात
केली.