भारताची ‘फुलराणी’ सायना नेहवालला चीन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. गतविजेती सायना जेतेपद कायम राखण्यासाठी आतुर होती, मात्र चीनच्या ली झेरुईने तिचे स्वप्न पूर्ण होऊ दिले नाही. झेरुईने सरळ सेट्समध्ये सायनावर २१-१२, २१-१५ असा विजय मिळवला.

ली झेरुईविरुद्धच्या ११ पैकी ९ लढतींत सायनाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. ही कामगिरी सुधारण्याची संधी सायनाकडे होती. मात्र सायनाच्या खेळाचा सखोल अभ्यास करून आलेल्या झेरुईने सर्वसमावेशक खेळ करीत बाजी मारली. पहिल्या गेममध्ये सायनाने ४-१ अशी आघाडी घेतली. मात्र सायनाच्या स्वैर खेळाचा फायदा उठवीत झेरुईने ७-४ अशी आगेकूच केली. ड्रॉपचा फटका आणि नेटजवळून शिताफीने खेळ करीत झेरुईने ही आघाडी ११-६ अशी वाढवली. तडाखेबंद स्मॅशचा फटका आणि शैलीदार खेळ करीत झेरुईने आघाडी वाढवीत पहिला गेम नावावर केला.
दुसऱ्या गेममध्ये सायनाने ४-० अशी आघाडी घेतली. यानंतर पल्लेदार रॅलीजमध्ये सायनाने गुणांची कमाई करीत ११-६ अशी बढत मिळवली. मात्र विश्रांतीनंतर स्मॅश आणि ड्रॉपच्या फटक्यांची खुबीने उपयोग करीत झेरुईने १३-१२ अशी वाटचाल केली. वेगवान खेळ करताना सायनाला शटलपर्यंत पोहोचण्यात वेळ लागेल अशी रणनीती झेरुईने वापरली आणि दुसऱ्या गेमसह सामन्यावर कब्जा केला.
सायनाने यंदाच्या वर्षांत सय्यद मोदी ग्रां.प्रि. स्पर्धा आणि इंडिया ओपन स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यानंतर बहुतांशी सुपर सीरिज स्पर्धाच्या उपांत्य फेरीपर्यंत तिने मजल मारली, मात्र जेतेपदाने हुलकावणी दिली आहे.

मी चांगली सुरुवात केली होती मात्र त्यानंतर शटलपर्यंत पोहोचण्यात मला अडचण जाणवली. हे खूप विचित्र होते. माझे खूप सारे फटके कोर्टबाहेर गेले. झेरुईने माझ्या खेळाचा सविस्तर अभ्यास केला होता. चटकन गुण मिळवण्याच्या नादात माझ्या हातून चुका झाल्या. माझ्या गतीला तिने चोख प्रत्युत्तर दिले. मी थोडा संयम दाखवायला हवा होता. माझ्या हातून झालेल्या चुकांचा तिने फायदा उठवला. या स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत माझी वाटचाल चांगली झाली होती. सन यू, नोझोमी ओखुहारा आणि वांग यिहानसारख्या मातब्बर खेळाडूंना नमवल्याचे समाधान आहे. मात्र जेतेपद पटकावता न आल्याचे शल्य राहील. माझा सर्वोत्तम खेळ होण्यासाठी आणखी सरावाची आवश्यकता आहे.
सायना नेहवाल</p>