अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सने सारा इराणीवर दणदणीत विजयासह फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान पटकावले. अपरिचित आणि नवख्या खेळाडूंमध्ये रंगलेल्या मुकाबल्यात तिमिआ बॅसिनझकीने अलिसन व्हॅन युटव्हॅनकला नमवत उपांत्य फेरी गाठली. मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या लढतीत फ्रान्सच्या जो विलफ्रेड सोंगाने जपानच्या केई निशिकोरीवर मात करत उपांत्य फेरीत आगेकूच k05केली.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या आणि जेतेपदाची प्रबळ दावेदार असणाऱ्या सेरेनाने इटलीच्या सारा इराणीवर ६-१, ६-३ असा सहज विजय मिळवला. आधीच्या तीन फेऱ्यांमध्ये सेरेनाने पहिला सेट गमावला होता. मात्र या सामन्यात नेहमीच्या आक्रमक पवित्र्यासह खेळणाऱ्या सेरेनाने साराला कोणताही संधी न देता विजय मिळवला. दोन वेळा फ्रेंच खुल्या स्पर्धेचे जेतेपद नावावर करणाऱ्या सेरेनाची उपांत्य फेरीत तिमिआ बॅसिनझकीशी लढत होणार आहे. तिमिआने युटव्हॅनकचा ६-४, ७-५ असा पराभव केला.
पुरुषांमध्ये जो विलफ्रेड सोंगाने पाचव्या मानांकित केई निशिकोरीवर ६-१, ६-४, ४-६, ३-६, ६-३ असा विजय मिळवला. एकाग्रता अचानक भंग पावल्यामुळे सामने गमावण्यासाठी सोंगा प्रसिद्ध आहे. निशिकोरीविरुद्ध दोन सेट जिंकत सोंगाने दमदार सुरुवात केली. मात्र निशिकोरीने जिद्दीने खेळ करत पुढचे दोन्ही सेट जिंकत बरोबरी केली. पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये सोंगाने जबरदस्त तडफेने खेळ करत बाजी मारली. उपांत्य फेरीत सोंगासमोर स्टॅनिसलॉस वॉवरिन्काचे आव्हान असणार आहे.
सानियासह भारताचे आव्हान संपुष्टात
महिला दुहेरीत अव्वल मानांकित सानिया मिर्झा आणि तिची सहकारी मार्टिना हिंगिस जोडीला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. बेथानी मॅटेक सँड्स आणि ल्युसी साफारोव्हा जोडीने सानिया-हिंगिस जोडीवर ७-५, ६-२ अशी मात केली. सानियाच्या पराभवासह मुख्य फेरीतील भारतीयांचे आव्हान संपुष्टात आले आहे. मिश्र दुहेरीत ब्रुनो सोरेसच्या साथीने खेळताना सानियाला सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. लिएण्डर पेस आणि रोहन बोपण्णा यांना पुरुष तसेच मिश्र दुहेरीत सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते.