सध्या विंडीजविरुद्ध भारताची एकदिवसीय मालिका सुरु आहे. मुंबईकर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याला या संपूर्ण मालिकेला मुकावे लागणार आहे. पदापर्णाच्या कसोटी सामन्यात तो दुखापतग्रस्त झाला होता. त्यानंतर आता त्याला सात आठवडे क्रिकेटपासून दूर राहावे लागणार आहे. त्यामुळे २१ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दौऱ्याला त्याला मुकावे लागणार असल्याची शक्यता आहे.

विंडीजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून त्याने पदार्पण केले. मात्र या कसोटीत केवळ १० चेंडू टाकल्यानंतर शार्दुलला दुखापत झाली. त्यामुळे पुढे तो गोलंदाजी करु शकला नाही. त्या सामन्यात त्याने केवळ फलंदाजी केली आणि मैदानाबाहेरच बसणे पसंत केले. परिणामी BCCI ने खबदारीचा उपाय म्हणून शार्दुलच्या जागी उमेश यादवची पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी संघात निवड केली होती. पुढील सामन्यांसाठी त्याच्या नावाचा विचार केला जाणार होता. पण सात आठवडे त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. त्यामुळे त्याला विंडीजविरुद्धच्या संपूर्ण मालिकेलाही मुकावे लागणार आहे.

दरम्यान, एकदिवसीय मालिकेत भारताने पहिला सामना ८ गडी राखून जिंकला. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी विंडीजचा चांगलाच समाचार घेतला. भारताच्या गोलंदाजांचीही विंडीजने धुलाई केली. या आधीही आशिया चषकात शार्दुल ठाकूरला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती.