भारताचा डावखुरा सलामीवीर शिखर धवन वेस्ट इंडिजविरुद्धची वन-डे मालिकाही खेळू शकणार नसल्याची शक्यता आहे. सय्यद मुश्ताक अली टी-२० स्पर्धेत खेळत असताना शिखरच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. या दुखापतीमधून तो अजून सावरलेला नाहीये. शिखर धवनच्या जागी संजू सॅमसनला भारतीय संघात जागा देण्यात आली होती, मात्र आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही.

शिखरच्या गुडघ्याला झालेली दुखापत अद्याप बरी झालेली नाही

 

टी-२० मालिकेआधी बीसीसीआयने जाहीर केलेल्या मेडीकल बुलेटीनमध्ये, शिखर धवनची दुखापत बरी होण्यासाठी काही कालावधी जाऊ शकतो अशी माहिती दिली होती. वन-डे मालिकेआधी शिखर भारतीय संघात पुनरागमन करेल अशी शक्यता बोलून दाखवण्यात येत होती. मात्र शिखरला दुखापतीमधून सावरण्यात काही कालावधी जाऊ शकतो असं वृत्त बंगळुरु मिरर वृत्तपत्राने दिलं आहे.

शिखर धवनच्या दुखापतीमुळे निवड समिती वन-डे मालिका सुरु होण्याआधीच पर्यायी खेळाडूची घोषणा करु शकतो. सध्या संघात जागा मिळालेल्या संजू सॅमसनलाच भारतीय संघात कायम ठेवण्यात येऊ शकतं किंवा मयांक अग्रवाल आणि शुभमन गिल या दोन खेळाडूंचा विचारही केला जाऊ शकतो. त्यामुळे याबद्दल निवड समिती नेमका काय निर्णय घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.