महाराष्ट्राची श्वेता आणि रायन मिश्र जोडी अव्वल

एकापेक्षा एक सरस पीळदार शरीरयष्टी असलेल्या देशातील अव्वल शरीरसौष्ठवपटूंचा मेळाच ‘तळवलकर क्लासिक’ स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळाला. या स्पर्धेत चांगली चुरस रंगली. शेवटपर्यंत श्वास रोखणाऱ्या या स्पर्धेत अखेर बाजी मारली ती भारतीय रेल्वेच्या राम निवासने. या वेळी भारतामध्ये प्रथमच झालेल्या मिश्र जोडी स्पर्धेत महाराष्ट्राची श्वेता राठोर आणि रायन कॅनेल यांनी बाजी मारली.

या स्पर्धेसाठी प्रत्येक राज्यातील अव्वल अशा ३० शरीरसौष्ठवपटूंना निवडण्यात आले होते. त्यामधून अंतिम फेरीसाठी दहा शरीरसौष्ठवपटूंना निवडले गेले. या दहा स्पर्धकांमध्ये अटीतटीची लढत या वेळी पाहायला मिळाली. परीक्षकही काही वेळापुरते संभ्रमात होते. त्यामुळे त्यांनी दहापैकी सहा शरीरसौष्ठवपटूंना एकाच वेळी तुलनात्मक स्पर्धेसाठी बोलावले. गतविजेत्या नौदलाचा मुरली कुमार या वेळी दहाव्या स्थानावर फेकला गेला. महाराष्ट्राच्या सागर कातुर्डेने पाचवा क्रमांक मिळवला, तर बी. महेश्वरन आणि जगदीश लाड यांना अनुक्रमे सातव्या आणि आठव्या क्रमाकांवर समाधान मानावे लागले. भारतातले नावाजलेले बॉबी सिंग आणि विपीन पीटर यांनाही या वेळी जेतेपदापासून दूर राहावे लागले. विजेता राम आणि त्याचा उत्तर प्रदेशचा सहकारी यतिंदर सिंग यांच्यामध्ये चांगली स्पर्धा पाहायला मिळाली. या दोन मित्रांमध्ये अखेर बाजी मारली ती रामनेच.

मिश्र जोडी प्रकारामध्ये या वेळी तीन जोडय़ांनी प्रदर्शन केले. यामध्ये जागतिक स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आलेल्या श्वेताने आपला सहकारी रायनबरोबर ही स्पर्धा एक हाती जिंकली. शरीरसौष्ठव आणि नृत्य यांची योग्य सांगड या जोडीकडून पाहायला मिळाली.

लोकांना असे वाटते की, भरपूर आहार घेतल्यावर चांगले पीळदार शरीर होते, पण तसे नाही. आमचा आहार हा सामान्य लोकांसारखा नसतो. आमच्या आहारात मीठ, तेल आणि तिखट अजिबात नसते. त्यामुळे आहारावर योग्य नियंत्रण ठेवल्यामुळेच मी ही स्पर्धा जिंकू शकलो.

राम निवास, विजेता शरीरसौष्ठवपटू

भारतामध्ये पहिल्यांदाच मिश्र जोडीची स्पर्धा झाली आणि त्यामध्ये आम्ही विजयी ठरलो, याचा फार आनंद आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर मी ही स्पर्धा पाहिली होती. त्याचा मला फायदा झाला. शरीरसंपदा दाखवताना त्याला नृत्याची सांगड घालायची असते. या नृत्याची संरचना मी केली होती. या विजयामुळे आत्मविश्वास उंचावला आहे.

श्वेता राठोर, मिश्र दुहेरीतील विजेती