अचूकतेच्या जवळ जाण्यासाठी आपण तंत्रज्ञान वापरतो, पण तंत्रज्ञान विकसित करणारा माणूस असतो आणि या तंत्रज्ञानाची दिशाभूल करण्याचेही ज्ञान त्याच्याकडे अवगत असते. क्रिकेटमध्ये काही महिन्यांपासून पंचांच्या विरोधात न्याय मागण्याची प्रणाली (डीआरएस) वापरण्यात येत आहे, पण या प्रणालीसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘हॉट-स्पॉट’ या तंत्रज्ञानाला निकामी करण्याचेही काही उपाय असल्याचे समोर आले आहे. फलंदाजी करताना जर बॅटला सिलिकॉनची पट्टी लावली तर ‘हॉट-स्पॉट’मध्ये चेंडू बॅटला लागला की नाही हे तपासणे अवघड बनू शकते. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्क आणि इंग्लंडचा तडाखेबंद फलंदाज केव्हिन पीटरसन हे बॅटला सिलिकॉनची पट्टी लावत असल्याचे समोर आले असून या दोघांनीही आपल्याला याबाबत काहीही अवगत नसल्याचे सांगत फसवणूक केल्याचे नाकारले आहे. पण असे असले तरी सिलिकॉन पट्टी ‘हॉट-स्पॉट’साठी डोकेदुखी ठरताना दिसत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) महाव्यवस्थापक जेफ अ‍ॅलार्डिस या प्रकरणाची चौकशी करणार असून ते चौथ्या कसोटी सामन्यासाठी डरहॅमला जाणार असल्याचे वृत्त ‘चॅनेल नाइन’ या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.
मला याबद्दल काहीच माहिती नव्हती, पण जर मी   फसवणूक केल्याचे म्हटले जात असेल तर सांगू इच्छितो की, ऑस्ट्रेलियाच्या संघामध्ये खेळाशी प्रतारणा करणारा एकही खेळाडू नाही. आम्ही अशा प्रकारचे क्रिकेट कधी खेळलेलो नाही. बॅट बनवणाऱ्या कंपनीने हे केले असावे, कारण सिलिकॉनच्या पट्टीचा ‘हॉट-स्पॉट’वर परिणाम होतो, हे बऱ्याच जणांना माहिती नाही.’’
– मायकेल क्लार्क, ऑस्ट्रेलियाचा कर्णधार

जेव्हा बॅटची कडा लागून मी बाद झालो आहे तेव्हा मी स्वत:हून मैदान सोडलेले आहे. जर असे होत असेल तर पायचीत निर्णय घेताना समस्या जाणवू शकते. कारण जर सिलिकॉनची पट्टी वापरली तर पायचीतचा निर्णय घेत असताना बॅटला चेंडू लागण्याचे कळणार नाही. तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात पायचीतची अपील केल्यावर चेंडूला बॅटची कडा लागल्याचे निष्पन्न झाले होते.’’
– केव्हिन पीटरसन, इंग्लंडचा फलंदाज

जेव्हा तुम्ही फसवणूक केल्याचे सांगितले जाते, तेव्हा तुम्ही या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावून तुमचे नाव त्या प्रकरणापासून दूर करता, कारण तेव्हा तुम्ही काहीही चुकीचे केलेले नसते. बऱ्याच वर्षांपासून फलंदाज आपल्या बॅटवर पट्टय़ा लावत आले आहेत, बॅटचे संरक्षण व्हावे आणि बॅट जास्त काळ चालावी, यासाठी पट्टय़ा लावल्या जातात. माझ्या मते ही गोष्ट खोडसाळपणाची आहे.

सिलिकॉन पट्टीचा विषय गंभीर -वॉरेन ब्रेननॅन
सिडनी : सिलिकॉन पट्टीचा विषय सर्वासमोर आल्यावर ‘चॅनेल नाइन’ या वृत्तवाहिनीने हे तंत्रज्ञान विकसित केलेल्या वॉरेन ब्रेननॅन यांच्याशी बातचीत केली. या वेळी त्यांनी हा विषय गंभीर असल्याचे म्हटले आहे. तंत्रज्ञानाला फसवण्यासाठी बॅटला सिलिकॉनची पट्टी लावण्यात आल्याची भीती वॉरेन यांनी प्रकट केल्याचे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. ब्रेननॅन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) महाव्यवस्थापक जेफ अ‍ॅलार्डिस यांची भेट घेतली असून याविषयाबद्दलची आपली मते मांडली आहेत. ब्रेननॅन यांनी आयसीसीला सध्याच्या घडीला शांत राहण्याचे सांगितल्याची माहिती वृत्तवाहिनीने दिली आहे.
अ‍ॅलिस्टर कुक, इंग्लंडचा कर्णधार