केरळचे माजी रणजीपटू जयमोहन थम्पी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्यांचा मुलगा आश्विन याला अटक केली आहे. एक आठवड्यापूर्वी जयमोहन यांचा मृतदेह घरात सापडला होता. पोलिसांनी याप्रकरणी कारवाई करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. प्राप्त झालेल्या अहवालानुसार थम्पी यांचा मृत्यू डोक्याला झालेल्या जखमांमुळे झाल्याचं निष्पन्न झालं.

६२ वर्षीय थम्पी हे काही वर्षांपूर्वी स्टेट बँक ऑफ त्रावणकोर मधून डेप्युटी जनरल मॅनेजर या पदावरुन निवृत्त झाले होते. शनिवारी थम्पी आणि त्यांचा मुलगा आश्विन घरात एकत्र दारु पित बसले होते. यावेळी वडिल-मुलामध्ये भांडणाला सुरुवात झाली आणि थम्पी यांनी आपल्या मुलाला मी दिलेलं एटीएम कार्ड परत दे असं सांगितलं. यानंतर संतापलेल्या आश्विनने थम्पी यांना जोरात धक्का दिला, ज्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. हा प्रकार घडल्यानंतर आश्विनने आपला भाऊ आणि इतर नातेवाईंकांना मदतीसाठी फोन केला परंतू कोणीही त्याची मदत करण्यासाठी नकार दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणाकडूनच मदत मिळत नसल्यामुळे आश्विनने आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर तिकडेच बसून दारुचं सेवन करुन त्याच खोलीत झोपण पसंत केलं. दुसऱ्या दिवशी घरकामासाठी आलेल्या बाईला घरातून वास यायला लागल्यामुळे तिने शेजाऱ्यांना याविषयी माहिती दिली. प्राथमिक चौकशीत आश्विनने आपल्याला वडिल कधी पडले याबद्दल माहिती नसल्याचं सांगितलं. मात्र शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली असता आश्विनने आपला गुन्हा मान्य केला. यष्टीरक्षक फलंदाज असलेल्या जयमोहन थम्पी यांनी केरळ संघाकडून ६ प्रथमश्रेणी सामने खेळले होते.