दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सेंट लुसिया येथे दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. या कसोटीत आफ्रिकेचा फिरकीपटू केशव महाराजने हॅट्ट्रिक नोंदवत धमाल उडवून दिली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो दक्षिण आफ्रिकेचा दुसरा गोलंदाज ठरला. तब्बल ६१ वर्षांनी आफ्रिकेच्या खेळाडूने हॅट्ट्रिक घेतली आहे. यापूर्वी जेफ ग्रिफिन यांनी १९६०मध्ये ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर इंग्लंडविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती.

दक्षिण आफ्रिकेने दुसर्‍या आणि अंतिम कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजला विजयासाठी ३२४ धावांचे लक्ष्य ठेवले. १०७ धावांवर विंडीजने त्यांचे तीन गडी गमावले. अशा परिस्थितीत त्यांना मोठी भागीदारी हवी होती, पण केशव महाराजने विंडीजला हादरे दिले. या फिरकी गोलंदाजीने ३७व्या षटकात एकापाठोपाठ तीन खेळाडूंना पॅव्हिलियनमध्ये पाठवले. त्याने कीरन पॉवेल, जेसन होल्डर आणि जोशुआ दा सिल्वा यांना माघारी धाडत हॅट्ट्रिक पूर्ण केली. कसोटी हॅट्ट्रिक घेणारा केशव दक्षिण आफ्रिकेचा पहिला फिरकीपटू ठरला आहे.

 

 

 

हेही वाचा – टोकियो ऑलिम्पिकमध्ये राणी रामपाल करणार टीम इंडियाचे नेतृत्व

केशवने तिन्ही फलंदाजांना झेलबाद केले. त्याने ३७व्या षटकातील तिसर्‍या चेंडूवर पॉवेलला बाद केले. पॉवेलने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण एनरिक नॉर्कियाने त्याचा झेल दिला. पॉवेलने ११६ चेंडूंचा सामना करत ५१ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार ठोकले. त्यानंतर केशवने चौथ्या चेंडूवर होल्डरला कीगन पीटरसनकरवी झेलबाद केले. पाचव्या चेंडूवर केशवने जोशुआला बाद केले. मुल्डरने जोशुआचा अप्रतिम झेल टिपला.