अव्वल दर्जाचे खेळाडू कशी कामगिरी करतात यापेक्षाही एखादा खेळाडू उत्तेजक सेवनाखाली दोषी आढळणार नाही याचेच सावट जागतिक इनडोअर मैदानी स्पर्धेवर निर्माण झाले आहे. या स्पर्धेस गुरुवारपासून प्रारंभ होत आहे.जागतिक उत्तेजक प्रतिबंधक समितीच्या शिफारसीनंतर आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने (आयएएएफ) रशियन अ‍ॅथलेटिक्स महासंघाची मान्यता काढून घेतल्यानंतर रशियन खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेपासून मुकावे लागणार आहे. इथिओपिया, केनिया, मोरोक्को, युक्रेन व बेलारुस यांच्याही खेळाडूंना आयएएएफने उत्तेजक सेवनाच्या कारवाईचा इशारा दिला आहे. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत दोनशे देशांमधील सहाशेहून अधिक धावपटू सहभागी झाले आहेत.