नवी दिल्लीत सुरु असलेल्या आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सुनील कुमारने इतिहास घडवला आहे. ८७ किलो वजनी गटात सुनील कुमारने अंतिम फेरीत किर्गिस्तानच्या अझत साल्दिनोव्हचा ५-० ने पराभव केला. तब्बल २७ वर्षांनी आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला ग्रेको रोमन प्रकारात सुवर्णपदक मिळालं आहे.

उपांत्य फेरीत सुनील कुमारचं आव्हान संपुष्टात येण्याची दाट शक्यता होती. कझाकिस्तानचा प्रतिस्पर्धी अझामत कुस्तुबायेव १-८ च्या फरकाने आघाडीवर होता. मात्र सुनीलने अखेरच्या क्षणात डाव पलटवत सलग ११ गुणांची कमाई करत धक्कादायक विजयाची नोंद केली. १२-८ च्या फरकाने सुनीलने उपांत्य सामन्यात बाजी मारली.

२०१९ साली झालेल्या स्पर्धेतही सुनीलने अंतिम फेरीत प्रवेश केला होता, मात्र त्या स्पर्धेत सुनीलला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं होतं. याव्यतिरीक्त ५५ किलो वजनी गटात भारताच्या अर्जुन हलकुर्कीने ग्रेको-रोमन प्रकारात कांस्यपदकाची कमाई केली.