टीम इंडियाचा विश्वचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत पराभव झाला. न्यूझीलंडने भारताला पराभवाची चव चाखायला लावली आणि स्पर्धाबाहेरचा रस्ता दाखवला. त्यानंतर टीम इंडियाचा प्रशिक्षक वर्ग बदलणार अशी मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. BCCI ने यासाठी नवे अर्जदेखील मागवले असून नव्या प्रशिक्षक वर्गाची निवड करण्यासाठी एक त्रिसदस्यीय समितीही गठीत केली आहे. पण असे असले तरीही भारताच्या मुख्य प्रशिक्षकपदाची माळ सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याच गळ्यात पडणार असे संकेत मिळत आहेत.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले. महत्वाची बाब म्हणजे पीटीआयच्या वृत्तानुसार या पदासाठी अर्ज करणाऱ्यांचे वय हे ६० पेक्षा कमी असावे आणि त्या उमेदवाराला किमान २ वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव अशी अट ठेवण्यात आली आहे. पण सध्याचा प्रशिक्षक वर्ग या प्रक्रियेसाठी कोणत्याही निकषाविना पात्र ठरणार आहे.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकांची निवड करण्यासाठी BCCI ने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. या समितीचे अध्यक्षपद माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे देण्यात आले असून त्यांच्यासह अंशुमन गायकवाड व शांथा रंगास्वामी हे देखील या समितीचे सदस्य आहेत. यातील अंशुमन गायकवाड यांनी रवी शास्त्री यांचीच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून फेरनिवड केली जाईल असे संकेत दिले आहेत. अंशुमन गायकवाड हे मिड डेशी बोलताना म्हणाले की टीम इंडियाची गेल्या काही काळातील कामगिरी पाहता मी समाधानी आहे. टीम इंडियाने चांगले क्रिकेट खेळून उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे नव्याने प्रशिक्षक वर्ग निवडताना त्यात रवी शास्त्री वगळता इतर जागांसाठी शोध घेणे आवश्यक आहे असे मला वाटते.

BCCI ने टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक, फलंदाजी प्रशिक्षक, गोलंदाजी प्रशिक्षक, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक, फिजिओ, स्ट्रेन्थ अँड कंडिशनिंग प्रशिक्षक आणि प्रशासकीय व्यवस्थापक या जागांसाठी अर्ज मागवले आहेत. ३० जुलै संध्याकाळी ५ वाजेपर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची कालमर्यादा देण्यात आली आहे.