इनचॉन-दक्षिण कोरिया येथील अन्सन संगास्कू जिम्नॅशियमच्या मैदानावर होणाऱ्या चौथ्या आशियाई इनडोअर कबड्डी स्पर्धेचा स्पर्धा कार्यक्रम कॅन क्युंग सँग यांनी जाहीर केला. या स्पर्धेत पुरुष विभागात सात, तर महिला विभागात आठ देशांनी सहभाग घेतला आहे. या संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली असून भारताच्या दोन्ही संघांचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. महिलांची स्पर्धा प्रथमच होत असून त्याला चांगला प्रतिसाद लाभला आहे. महिलांमध्ये भारताला थायलंड, इराण यांच्याकडून कडवा प्रतिकार होण्याची शक्यता आहे. या स्पर्धेच्या तयारीकरिता थायलंडने नुकताच महाराष्ट्राचा दौरा केला होता. भारताचा पुरुष संघ गतविजेता संघ असून त्यांची तयारी उत्तम आहे; परंतु त्यांना इराण, पाकिस्तान कडवी लढत देतील, असा होरा आहे. या स्पर्धेतील पहिला सामना थायलंड आणि व्हिएतनाम या दोन महिला संघांमध्ये होणार असून दुसऱ्या सामन्यात भारताच्या महिला तुर्कस्थानबरोबर लढतील. भारताच्या पुरुषांना जपानशी लढावे लागेल. हा २९ जून या दिवसातील शेवटचा सामना असेल. ही स्पर्धा प्रथम साखळी व नंतर बाद पद्धतीने खेळविली जाईल.