बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या लढतीत स्टुअर्ट बिन्नीच्या अविश्वसनीय कामगिरी जोरावर भारतीय संघाने विजय मिळवला. या विजयासह भारताने ही मालिका जिंकली. गुरुवारी होणाऱ्या लढतीत विजय मिळवत निर्भेळ यश साजरे करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे.
दुसऱ्या सामन्यात तास्कीन अहंमदने घेतलेल्या पाच बळींमुळे भारतीय संघ १०५ धावांत कोसळल्यानंतर बांगलादेश सहज विजय मिळविल अशी स्थिती होती, मात्र स्टुअर्ट बिन्नी व मोहित शर्मा यांच्या प्रभावी गोलंदाजीपुढे बांगलादेशचा ५८ धावांत खुर्दा उडाला होता. बिन्नीने सहा बळी घेतले होते तर शर्माने चार गडी बाद केले होते. हा सामना जिंकून भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
मालिका विजय निश्चित झाला असला तरी चेतेश्वर पुजारा व अंबाती रायुडु यांचे फलंदाजीतील अपयश ही संघासाठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे त्यांच्यापैकी एका खेळाडूस विश्रांती देत केदार जाधव याला स्थान मिळण्याची शक्यता आहे. रैना, रिद्धिमन साह यांनाही फलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. गोलंदाजीत फारसा बदल होण्याची शक्यता कमी आहे. हा सामना जिंकून यशस्वी सांगता करण्यासाठी भारताचा कर्णधार सुरेश रैना उत्सुक झाला आहे.
दुसऱ्या सामन्यात हातातील विजय घालविणारा बांगलादेश संघ अखेरचा सामना जिंकून उर्वरित लाज राखण्यासाठी प्रयत्न करील असा अंदाज आहे. त्यासाठी त्यांना फलंदाजीत अव्वल दर्जाची कामगिरी करावी लागणार आहे.
दोन्ही संघ-भारत-सुरेश रैना (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रॉबिन उथप्पा, चेतेश्वर पुजारा, अंबाती रायुडु, रिद्धिमन साह, अक्षर पटेल, परवेझ रसूल, मोहित शर्मा, उमेश यादव, अमित मिश्रा, मनोज तिवारी, केदार जाधव, स्टुअर्ट बिन्नी, आर. विनयकुमार.
बांगलादेश- मुशफिकर रहेमान (कर्णधार), तमिम इक्बाल, अनामुल हक बिजॉय, मोमीनुल हक, मुशफिकर रहीम, शकीब अल हसन, महंमदुल्लाह रियाध, नासिर हुसेन, झियाउर रहेमान, मश्रफ मोर्तझा, अब्दुर रझाक, अल अमीन हुसेन, तासकिन अहमद. सोहाग गाझी, शमसूर रहेमान. सामन्याची वेळ : दुपारी १ वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १