कबड्डी रसिकांना थरारक चढाई-पकडीचा खेळ पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. निमित्त आहे तिसऱ्या पुरुष कबड्डी विश्वचषकाचे. विजयवाडा येथे पुढील वर्षी २७ ते ३१ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. जगभरातील २० संघांना या स्पर्धेसाठी निमंत्रण पाठवण्यात आल्याचे आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघ, आशियाई कबड्डी महासंघ तसेच भारतीय हौशी कबड्डी महासंघाचे अध्यक्ष जनार्दन गेहलोत यांनी सांगितले.
भारताव्यतिरिक्त पाकिस्तान, इराण, तुर्कमेनिस्तान, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान, थायलंड, व्हिएतनाम, मलेशिया, कोरिया, तैवान, जपान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, कॅनडा, अमेरिका, इटली आणि मेक्सिको हे संघ सहभागी होणार आहेत.
‘‘गेल्या काही वर्षांमध्ये जगभरात कबड्डीचा व्यापक प्रमाणावर प्रसार झाला असून, आम्हालाही हा खेळ खेळायचा आहे. अशा स्वरूपाची चौकशी आमच्याकडे सातत्याने केली जाते. खेळातील साधेपणा हा कबड्डीच्या लोकप्रियतेचा मुख्य आधार ठरला आहे,’’ असे गेहलोत यांनी सांगितले.  
याआधीच्या दोन विश्वचषक स्पर्धा मुंबई आणि पनवेल येथे झाल्या होत्या. मुंबईतील स्पर्धेत १२ तर पनवेल येथील स्पर्धेत १४ संघ सहभागी झाले होते. यंदा संघांच्या संख्येत निश्चित भर पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.