News Flash

धोनी, रहाणे, अश्विन, जडेजा यांच्यावर नजरा

आयपीएलमध्ये दोन वर्षांसाठी नव्याने दाखल झालेले पुणे आणि राजकोट हे संघ संघबांधणीसाठी सज्ज झाले आहेत.

धोनी, रहाणे, अश्विन, जडेजा

पुणे, राजकोटच्या संघबांधणीसाठी आज लिलाव
भारताचा मर्यादित षटकांच्या संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सुरेश रैना या नावाजलेल्या खेळाडूंचा लिलाव मंगळवारी करण्यात येणार आहे. आयपीएलमध्ये दोन वर्षांसाठी नव्याने दाखल झालेले पुणे आणि राजकोट हे संघ संघबांधणीसाठी सज्ज झाले आहेत.
आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणामुळे चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे दोन नवीन संघांची दोन वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. कोलकाताचे उद्योजक संजीव गोएंका यांनी पुण्याची फ्रँचायझी विकत घेतली आहे, तर इन्टेक्स मोबाइल कंपनीने राजकोटची फ्रँचायझी विकत घेतली आहे. चेन्नई आणि राजस्थान या संघांतील खेळाडूंबरोबर अन्य काही खेळाडूंचाही या वेळी लिलाव करण्यात येणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्हन स्मिथ, निवृत्ती पत्करलेला शेन वॉटसन, न्यूझीलंडचा ब्रेंडन मॅक्क्युलम, वेस्ट इंडिजचा ड्वेन ब्राव्हो यांच्यासह एकूण ५० खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे.
या खेळाडूंचे दोन गट करण्यात आले आहेत. त्याचबरोबर काही अव्वल खेळाडूंचा लिलाव ड्राफ्ट पद्धतीने करण्यात येणार आहे. या दोन्ही संघांना खेळाडूंना संघात घेण्यासाठी किमान ४० कोटी आणि कमाल ६६ कोटी रुपयांची मर्यादा ठरवण्यात आली आहे.
‘‘या लिलावात ड्राफ्ट पद्धतीने पाच खेळाडूंना संघात घेता येईल. ज्या खेळाडूंचा या वेळी लिलाव होणार नाही त्यांना फेब्रुवारीमध्ये खुल्या लिलावात संधी देण्यात येईल,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळातील सूत्रांनी सांगितले.
या लिलावामध्ये सर्वात लक्षवेधी असेल तो महेंद्रसिंग धोनी. कारण धोनीने भारताला दोन विश्वचषक जिंकून दिले आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी केली आहे. अजिंक्य रहाणेनेही आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्याचबरोबर अजिंक्य हा राजस्थानच्या फलंदाजीचा कणा समजला जात होता. त्यामुळे त्याला संघात घेण्यात दोन्ही संघ कमालीचे उत्सुक असतील. राजस्थानच्या संघाचा नवीन नायक स्टिव्हन स्मिथने चाणाक्ष नेतृत्व केले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना त्याने दमदार प्रदर्शन केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत आर. अश्विनने तब्बल ३१ बळी मिळवत मालिकावीराचा पुरस्कार पटकावला होता. त्याचबरोबर ट्वेन्टी-२० सामन्यांमध्ये त्याच्याकडून लक्षणीय कामगिरी पाहायला मिळाली आहे. रवींद्र जडेजाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत पदार्पण करत आपली छाप पाडली आहे. दोन्ही संघांना अव्वल खेळाडू घेताना १२.५ कोटी रुपये मोजावे लागतील. त्यानंतर प्रत्येक नावाजलेल्या खेळाडूसाठी त्यांना अनुक्रमे ९.५, ७.५, ५.५ आणि चार कोटी रुपये मोजावे लागतील.
लिलाव होणारे खेळाडू
भारतीय (३३) : महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जडेजा, धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, आशीष नेहरा, इरफान पठाण, सुरेश रैना, संजू सॅमसन, मोहित शर्मा, राहुल शर्मा, बाबा आपराजित, अंकुश बैन्स, रजत भाटिया, एकलव्य द्विवेदी, दीपक हुडा, विक्रमजित मलिक, मिथुन मन्हास, रोनिस मोरे, करुण नायर, पवन नेगी, ईश्वर पांडे, प्रदीप साहू, दिनेश साळुंखे, बरिंदर सिंग सरण, अंकित शर्मा, प्रत्युश सिंग, प्रवीण तांबे, राहुल तेवाटिया, सागर त्रिवेदी आणि दिशांत याग्निक.
परदेशी (१७) : फॅफ डय़ू प्लेसिस, कायले अ‍ॅबॉट, जुआन थेरॉन (दक्षिण आफ्रिका) सॅम्युअल बद्री, ड्वेन ब्राव्हो, ड्वेन स्मिथ (वेस्ट इंडिझ), स्टिव्हन स्मिथ, माईक हसी, बेन कटिंग, जेम्स फॉकनर, शेन वॉटसन अ‍ॅड्रय़ू टीये, (ऑस्ट्रेलिया) मॅट हेन्री, ब्रेण्डन मॅक्क्युलम, ख्रिस्तोफर मॉरिस, केन रिचर्डसन, टीम साऊथी (न्यूझीलंड)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2015 5:10 am

Web Title: today auction of pune rajkot
Next Stories
1 रिअल माद्रिदच्या जेतेपदाच्या आशा धूसर
2 गतविजेत्या बार्सिलोनासमोर आर्सेनलचा अडथळा
3 ट्वेन्टी- २० विश्वचषकासाठी मोहालीला हिरवा कंदील
Just Now!
X