20 September 2020

News Flash

शंभर नंबरी टूर..

युरोपमधील निसर्गरम्य वातावरण, बर्फाळ प्रदेश, पर्वतरांगांमधील अवघड वळणे, घनदाट जंगले, ३२०० कि.मी.चे अंतर, अशा खडतर स्थितीतून मार्गक्रमणा करणारे सायकलपटू.. २३ दिवसांचा ‘टूर डी फ्रान्स’ शर्यतीचा

| June 29, 2013 04:13 am

युरोपमधील निसर्गरम्य वातावरण, बर्फाळ प्रदेश, पर्वतरांगांमधील अवघड वळणे, घनदाट जंगले, ३२०० कि.मी.चे अंतर, अशा खडतर स्थितीतून मार्गक्रमणा करणारे सायकलपटू.. २३ दिवसांचा ‘टूर डी फ्रान्स’ शर्यतीचा हा नयनरम्य सोहळा पाहण्याची संधी शनिवारपासून तमाम चाहत्यांना मिळणार आहे. यंदा १००व्या मोसमात पदार्पण करणाऱ्या या शर्यतीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. लान्स आर्मस्ट्राँगच्या कृष्णकृत्यांमुळे या शर्यतीवर उत्तेजकाचा कलंक लागला असला तरी या स्पर्धेची लोकप्रियता आणि क्रेझ किती आहे, हे तीन आठवडय़ांच्या थरारानंतरच स्पष्ट होईल.

क्रिकेटच्या मैदानावर चौकार व षटकारांच्या आतषबाजींचे शतक आपण नेहमीच पाहतो. मात्र या शतकापेक्षाही जास्त संयम, चिकाटी व अतुलनीय कौशल्य याची कसोटी पाहणाऱ्या टूर-डी-फ्रान्स या सायकल शर्यतींचे शतक ही प्रत्येक सायकलपटूसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. तीन आठवडय़ांच्या या शर्यतीत निसर्गाच्या वेगवेगळ्या रूपांचे दर्शन घडतेच, पण त्याचबरोबर विभिन्न प्रकारच्या हवामानात सायकल चालवणे, हे अतिशय आव्हानच मानले जाते.
क्रीडाविषयक नियतकालिकाच्या प्रसाराकरिता १९०३ मध्ये सुरू झालेल्या या शर्यतीने आजपर्यंत अनेक कटू आठवणी पाहिल्या. अनेक संकटांशी सामना केला, मात्र दोन महायुद्धांचा कालावधी वगळता ही शर्यत अव्याहतपणे सुरू आहे. फ्रान्समध्ये शनिवारपासून प्रारंभ होणाऱ्या या २३ दिवसांच्या शर्यतीत अडीचशेपेक्षा जास्त सायकलपटू ३२०० किलोमीटर अंतरामध्ये आपले सायकलिंग कौशल्य आजमावणार आहेत.
‘एलऑटो’ या क्रीडाविषयक नियतकालिकेच्या संपादकपदाची जबाबदारी हेन्री डेसग्रेड यांच्याकडे आली. सायकलिंगची विलक्षण आवड असणाऱ्या या संपादकापुढे आपले नियतकालिक लोकप्रिय करण्याचे आव्हान होते. त्यांच्याकडे मुख्य सायकलिंग वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या जिओ लेफेव्रे यांनी नियतकालिकाचा खप वाढविण्यासाठी सहा दिवसांची सायकल शर्यत आयोजित करण्याची कल्पना त्यांना सुचविली. डेसग्रेड यांनी त्वरित त्याला होकार दिला. १९०३मध्ये या शर्यतीचे पहिल्यांदा आयोजन करण्यात आले. सुरुवातीला ही शर्यत फक्त फ्रेंच लोकांपुरतीच मर्यादित होती. पहिली शर्यत जिंकण्याचा मान मॉरिस गॅरिन यांनी मिळविला. डेसग्रेड यांचा सायकल शर्यत सुरू करण्यामागचा हेतू सफल झाला, पण त्याचबरोबर सायकलिंग क्षेत्राला अतिशय प्रतिष्ठेची शर्यत लाभली.
ज्याप्रमाणे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते ते ग्रँड स्लॅम स्पर्धेत भाग घेण्याचे, तद्वत प्रत्येक आंतरराष्ट्रीय सायकलपटू या शर्यतीत भाग घेण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून असतो. सुरुवातीला फक्त फ्रान्समधील मार्गापुरतीच ही शर्यत मर्यादित होती. कालांतराने अँडोरा, बेल्जियम, इंग्लंड, जर्मनी, आर्यलड, इटली, लक्झेंबर्ग, मोनाको, नेदरलँड्स, स्पेन, स्वित्र्झलड या देशांमधूनही या शर्यतीचा मार्ग नेण्यात आला आहे. आल्प्स व पेरिनीस या दोन पर्वतांमधूनही ही शर्यत जाते. त्यामुळेच अवघड वळणे, बर्फाळ प्रदेशातील मार्ग, चिखलमय मार्ग, भुसभुशीत माती, घनदाट जंगलातील मार्ग आदी अनेक अडथळे या शर्यतीत पार करावे लागत असल्यामुळे खेळाडूंच्या शारीरिक व मानसिक तंदुरुस्तीची कसोटीच ठरते.
आता आधुनिक सुविधांचा ‘परिसस्पर्श’ या शर्यतीला लाभला आहे. पूर्वीच्या काळी खेळाडूंना फारशा सुविधा नव्हत्या. पायडलिंग करीतच उंच डोंगराळ मार्ग पार करावा लागत असे. आता सुरक्षिततेच्या अनेक सुविधा आल्या आहेत. नी गार्ड, हेल्मेट, ठिकठिकाणी फिडिंगच्या सुविधा मिळू लागल्या आहेत. पूर्वी फारसे स्वयंसेवक नव्हते. अनेक वेळा रात्री अतिशय अंधुक प्रकाशात सायकलिंग करावे लागत असे. ठिकठिकाणी असलेल्या चेकपॉइंट्सवर जाऊन हातावर शिक्का घ्यावा लागत असे. आता खूपच सुधारणा झाल्या आहेत. संयोजनांतही व्यावसायिकता आली आहे. अधिकाधिक पारितोषिकांचाही वर्षांव सुरू झाला आहे. प्रत्येक टप्प्यातील विजेता, एकूण विजेता, पर्वतराजीच्या टप्प्यातील विजेता, सर्वात वेगवान संघ, २५ वर्षांखालील युवा खेळाडू आदी अनेक बक्षिसे सुरू करण्यात आली आहेत.
सन १९३० ते १९६० या कालावधीत प्रत्येक शर्यतीच्यावेळी सहभागी खेळाडूंची मिरवणूक काढण्याची प्रथा होती. खेळाडूंबरोबरच काही उत्साही प्रायोजक कंपन्याच्या सजवलेल्या मोटारींचाही या मिरवणुकीत सहभाग असायचा. या शर्यतींद्वारे आपल्या उत्पादनांची जाहिरातबाजी करण्याचाही प्रयत्न अनेक कंपन्यांनी केला. एका चॉकलेट कंपनीने शर्यतीद्वारे आपल्या चॉकलेट्सचा खप वाढविण्यासाठी पाच लाख टोप्यांचे वाटप पोलीस, अन्य स्वयंसेवक व खेळाडूंमध्ये केले. त्याखेरीज हजारो टन चॉकलेट्सच्या विक्रींची व्यवस्था शर्यतीच्या मार्गावर केली.
या शर्यतीची लोकप्रियता अफाट असल्यामुळे शर्यतींच्या अनेक ठिकाणी चाहते मोठय़ा प्रमाणावर उपस्थिती लावतात. अनेक जण पारंपरिक व फॅशनची वेशभूषा करीत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करतात. काही उत्साही छायाचित्रकार चांगली छायाचित्रे काढता यावी यासाठी तंबू व अन्य सामुग्री घेऊन शर्यतीच्या मार्गाजवळ मुक्काम करतात. शर्यतीच्या वेळी चिअरलीडर्सही ठेवण्यात आले. चिअरलीडर्सच्या संकल्पनेला पाठिंबा देत संयोजकांकडून सांगण्यात येते की, चिअरलीडर्समुळे स्पर्धकांच्या पायातील ताकद वाढते, त्यांची ऊर्जा वाढते व अधिक चांगल्या पद्धतीने ते सायकलिंग करतात. या शर्यतींमुळे अनेक गीतकारांना गाणी लिहायला सुचले आहे तर एक दोन चित्रपट निर्मात्यांनी या शर्यतीच्या आधारे चित्रपटही काढले आहेत.
उत्तेजक द्रव्य सेवन केल्याच्या कटू प्रसंगांचाही या शर्यतीला अपवाद नाही. १९२४मध्ये हेन्री पेलिसिअर व त्याचा भाऊ चार्ल्स् यांनी आपण वेदनाशमक औषधे घेतल्याचे तसेच पायाला वेदनाशमक तेल चोपडल्याचे मान्य केले होते. तेव्हापासूनच या शर्यतीला उत्तेजकाची कीड लागली आहे. लान्स आर्मस्ट्राँगने सलग सात वर्षे ही शर्यत जिंकली, मात्र आपण प्रत्येक वेळी उत्तेजक औषध सेवन केल्याचे त्याने मान्य केल्यामुळे त्याची विजेतेपदे काढून घेण्यात आली. गेल्या ९९ शर्यतींमध्ये उत्तेजक सेवनामुळे खेळाडूंवर कारवाई करण्याचे अनेक प्रसंग घडले. असे असले तरी युरोपातील निसर्गरम्य वातावरणात होणाऱ्या या शर्यतीबद्दल आजही चाहत्यांमध्ये विलक्षण आवड आहे, हीच या शर्यतीची किमया आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2013 4:13 am

Web Title: tour de france season debut in century
Next Stories
1 यहां के हम सिकंदर..
2 उत्तेजकांशिवाय ‘टूर डी फ्रान्स’ शर्यत जिंकणे अशक्य -आर्मस्ट्राँग
3 १९ जुलै रोजी खेळाडूंचा लिलाव
Just Now!
X