खेळ हाच ज्याचा श्वास, खेळ हेच त्याचे कुटुंब, खेळ हेच ज्याचं जगणं अशा वि. वि. करमरकरांना रविवारी पाऊणशे वर्षे पूर्ण होत आहेत, यावर विश्वास कुणी ठेवावा? कारण तारुण्यातील चपळता, रोकठोक व तर्कशुद्ध विचार आणि खेळाडू वा क्रीडा संघटनांवरील अन्यायावर बेधडक निर्भयपणे भिडणारे करमरकर आजही तसेच आहेत. देशी व ऑलिम्पिक खेळाच्या प्रचार-प्रसार आणि विकासासाठी त्यांनी पदरमोड करून कोकणात खेडय़ापाडय़ांत भटकंती केली. खेळांच्या स्पर्धाचे आयोजन एवढाच उद्देश न ठेवता खेळाडूंची बौद्धिक, मानसिक व शारीरिक जडणघडण व्हावी, त्यागी-निष्ठावान खेळाडू घडावेत, याचा अखंड ध्यास घेऊन महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थेची त्यांनी निर्मिती केली. याचप्रमाणे गेले दशकभर रत्नागिरी, नाशिक, अहमदनगर जिल्ह्य़ांत देशी खेळांच्या स्पर्धाचे महाराष्ट्र क्रीडा विकास संस्थेमार्फत आयोजन करण्यात ते अग्रेसर राहिले. एका ज्येष्ठ क्रीडा पत्रकाराने सेवानिवृत्तीनंतरही हा वसा अविरत चालू ठेवला.
भारतातील इंग्रजी दैनिकांचे खेळाचे स्वतंत्र पान व क्रीडा पत्रकारिता गेली शे-दीडशे वर्षे रूढ आहे. मात्र जून १९६२पासून मराठीत खऱ्या अर्थाने त्याचे बिजारोपण झाले ते वि. वि. करमरकरांच्या प्रयत्नांतून आणि लेखणीतून. ‘वि.वि.क.’ या नावाने प्रचलित असलेले विष्णू विश्वनाथ करमरकर जन्मत: नाशिकचे. त्यांचा जन्म ११ ऑगस्ट १९३८चा. माध्यमिक शिक्षण नाशिकच्या न्यू हायस्कूलमध्ये झाले. पदवी परीक्षेपर्यंत ते नाशिकच्याच हंसराड प्रागजी ठाकरशी महाविद्यालयात शिकले. मात्र त्यानंतर मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्र विषयात एम.ए. झाले. करमरकरांचे वडील डॉ. वि. अ. करमरकर हे निष्णात डॉक्टर. मुलानेही आपल्याच क्षेत्रात कार्यरत व्हावे अशी प्रत्येक पित्याची इच्छा असते. मात्र वडिलांनी ‘विष्णू’चा बाळहट्ट पुरविला. त्याने निवडलेल्या क्षेत्रात त्यांना आडकाठी येऊ दिली नाही. वडील व आई सुशीलाताई यांनी करमरकरांना संस्कारित केले. रत्ना थोरात व माणिक मराठे या बहिणींनी व मेव्हण्यानी त्यांना प्रेम व आधार दिला. शालेय जीवनात प्रा. ग. वि. अकोलकर, रि.पु. वैशंपायन व भट तर महाविद्यालयात प्रा. वसंत कानिटकर, प्रा. आचार्य, प्रा. सोहोनी, प्रा. राम बापट, मुंबई विद्यापीठात प्रा. दांतवाला, प्रा. कांता रणदिवे व प्रा. अप्पू नायर यांनी करमरकरांच्या आचार-विचारांना दिशा दिली.
लोकशाही समाजवादी विचाराने क्रियाशील असलेल्या करमरकर यांनी डॉ. राम मनोहर लोहिया, एस. एम. जोशी, मधू लिमये यांना आपले आदर्श मानले. पत्रकारिता करताना द्वा. भ. कर्णिक, गोविंद तळवलकर, दि. वि. गोखले, साखळकर, पुरुषोत्तम महाले, चंद्रकांत ताम्हाणे, दिनू रणदिवे यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाबद्दल ते कृतज्ञता व्यक्त करतात. पत्रकारितेची सुरुवात नाशिकचे रसरंग साप्ताहिक आणि मुंबईत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे प्रणेते एस. एम. जोशी यांनी सहकारी तत्त्वावर चालवलेल्या दैनिक ‘लोकमित्र’मधून केली. जून १९६२पासून ‘टाइम्स’ समूहाचे ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या क्रीडा विभागाचे प्रमुख आणि सहसंपादक (क्रीडा) या नात्याने खेळाच्या पानाचे यशस्वी संपादन केले. खेळाच्या बातम्या, समीक्षण व स्तंभलेखन याविषयी मराठी माणसाची अतृप्त, तहान-भूक भागवण्यास करमरकरांची क्रीडा पत्रकारिता पूरक ठरली आणि सर्व मराठी वृत्तपत्रांत क्रीडा पत्रकारांना मानाचे स्थान व हक्काचे पान उपलब्ध झाले.
क्रिकेट कसोटी मालिका, क्रिकेट विश्वचषक, ऑलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यांची दैनंदिन क्रीडा समीक्षा करणारे वि. वि. करमरकर यांचे स्तंभलेखन वाचकांनी उचलून धरले. आजही वाचकांना त्यांच्या लेखणीची ओढ कायम आहे. खेळाचे हौशी स्वरूप झपाटय़ाने बदलत गेले. पाश्चात्त्य दुनियेइतके अफाट प्रमाणात नसले तरीही भारतीय क्रीडा क्षेत्रात साधारणत: मध्यम स्वरूपाच्या उद्योग समूहाचे (इंडस्ट्री) रूप येत आहे. त्याचा वेध करमरकरांनी सर्वप्रथम घेतला. औद्योगिक समूहात अटळ असलेली स्टेडियम्स, क्रीडा संकुले यांची उभारणी-त्यावरील बेफाम खर्च, त्यातील भ्रष्टाचार यावर त्यांनी १९९३पासून झगझगीत प्रकाश टाकला. उत्सवमूर्ती सुरेश कलमाडी यांच्या बेगडी क्रीडाप्रेमावर टीकेची धार सतत धरत राहिले. याआधी १९८२च्या दिल्लीमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पध्रेच्या बांधकामात सुमारे १००पर्यंत अनामिक मजूर मृत्युमुखी पडले, त्याची कैफियत त्यांनी ‘रक्तरंजित’ मधून मांडली.
दक्षिण कोरिआ, क्युबा, केनिया आदी छोटय़ा देशांच्या तुलनेतील भारतीय खेळाडूंचे मागासलेपण या गोष्टी ते नेहमी मांडत राहिले. खेळ हा विषय कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यक्रम पत्रिकेवर नाही, ही व्यथा ते व्यक्त करतात. खेळाडू, प्रशिक्षक, पंच, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या सहभागाशिवाय खेळाचे पान कसदार होणार नाही. याची जाणीव करमरकरांना पहिल्यापासून होती. कितीतरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, संघटक, क्रीडा वैद्यकतज्ज्ञ यांच्या जिवंत अनुभवाचे त्यांनी शब्दांकन स्वत: केले. याचप्रमाणे सहकाऱ्यांमार्फत करून घेतले. बडय़ा क्रीडा स्पर्धांदरम्यान, विशेष पुरवण्यांनी क्रीडा पान सतत सजवले. आकाशवाणी, दूरदर्शन, विविध टी. व्ही. चॅनल्सवरील करमरकर यांनी केलेली सामन्यांची धावती समालोचने व समीक्षणे खूप गाजली. क्रिकेटप्रमाणे कबड्डी, खो-खो, टेबल टेनिस आदी खेळांच्या मराठीतील धावत्या समालोचनाने मराठी समीक्षेतील उणीव समर्थपणे दूर केली. निवृत्तीनंतर इतर वृत्तपत्रांप्रमाणे लोकसत्तातही त्यांनी लेखमाला लिहिल्या.
खेळासाठी झोकून काम करणाऱ्या या पत्रकाराने क्रीडा कार्यकर्त्यांची भूमिकाही बजावली. जे मनात घेतले तसे व्हायलाच हवे, हा हट्ट त्यांनी कायम धरला. वागण्यात लवचीकता ठेवली नाही. सत्याचा ध्यास धरत राहिले. यात खुपसण्यासारखे काही नसले तरी क्रीडा क्षेत्रात करमरकरांची शिडी वापरून वर चढलेल्यांनी त्यांच्यापासून दुरावा ठेवला याची खंत त्यांनाही जाणवत असेल. मात्र त्यांची पंच्याहत्तरी त्यांना ही खंत विसरायला लावेल. आताच्या क्रीडा क्षेत्रात करमरकरांसारखी माणसे शोधावी लागतील. एक करमरकर अनेक होण्याची गरज आहे. तोच क्रीडाक्षेत्रातील सुदिन ठरेल!
    (लेखक क्रीडा संघटक व मैदान     बचाव समितीचे अध्यक्ष आहेत.)

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
shrikant shinde
“राज ठाकरे महायुतीत आले, तर…”; मनसेच्या युतीतील प्रवेशाच्या चर्चांवर श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया
अनोखी इफ्तार मेजवानी; हिंदू महिलांकडून मुस्लिम महिलांसाठी गोड भेट
piyush goyal
लखलखत्या तरुण तेजांकितांचा आज गौरव; केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पियूष गोयल प्रमुख अतिथी