रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा

दिवसअखेर विदर्भाच्या १ बाद २६८ धावा

कर्णधार फैज फजल आणि वसीम जाफरच्या दमदार नाबाद शतकाच्या जोरावर विदर्भाने रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत बडोद्याविरुद्ध पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर एक गडी गमावून २६८ धावा केल्या.

सिव्हिल लाइन्स येथील व्हीसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात विदर्भाचा कर्णधार फैज फजलने नाणेफेक जिंकून धावांचा डोंगर उभारण्याच्या उद्देशाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर फैज फजल आणि आर. संजयने विदर्भाचा डाव सुरू केला. मात्र यापूर्वीच्या दोन्ही सामन्याप्रमाणे बडोद्याविरुद्धच्या लढतीमध्येही विदर्भाची सलामीवीर जोडी दमदार सुरुवात करण्यात अपयशीच ठरली. सामन्याच्या सहाव्या षटकांत मध्यमगती गोलंदाज लुकमन मेरीवालाच्या चेंडूवर यष्टिरक्षक पिनल शाहने आर. संजयला तीन  झेलबाद केले. त्यामुळे विदर्भाला १३ धावांवरच पहिला धक्का बसला.

पहिला गडी लवकरच गमवल्यानंतर सलामीवीर फैज फजल व वसीम जाफरने काही काळ सावध फलंदाजी केली. यानंतर दोन्ही फलंदाजांनी उपाहारापर्यंत विदर्भाची धावसंख्या ८३ केली. बडोद्याचा कर्णधार केदार देवधरने गोलंदाजीत वारंवार बदल केले. मात्र, जोडी फोडण्यात कोणालाही यश आले नाही. फैजने २२० चेंडूचा सामना करीत १२ चौकार व १ षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले. फैजचे यावर्षीच्या रणजी करंडकात हे दुसरे तर प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १७ वे शतक आहे. सामन्याच्या ७३व्या षटकांत दोन्ही धुरंधरांनी २०० धावांची भागीदारी करण्याचीही कामगिरी केली. बडोद्याच्या गोलंदाजांचा समाचार घेत अनुभवी जाफरने ८ चौकार, २ षटकारांच्या मदतीने १८९ चेंडूत यावर्षीच्या रणजी करंडकात पहिले शतक झळकावले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील जाफरचे हे ५४ वे शतक आहे. बडोद्याने सात गोलंदाजांचा वापर केला. मात्र,गवत असलेल्या खेळपट्टीवर टिकाव धरणाऱ्या फैज व जाफरची जोडी तोडण्यात पहिल्या दिवशी कोणीही यशस्वी ठरले नाही.  विदर्भाने पहिल्या दिवसअखेर एक गडी गमावून २६८ धावा करीत स्थिती भक्कम केली असून शतकवीर फैज फजल १२४ धावा (२८५ चेंडू, १२ चौकार, २ षटकार) आणि वसीम जाफर १३१ धावा (२४१ चेंडू, १० चौकार, २ षटकार)  करून खेळपट्टीवर आहेत.

संक्षिप्त धावफलक

विदर्भ (पहिला डाव) : ९० षटकांत १ बाद २६८ (फैज फजल नाबाद १२४, वसीम जाफर नाबाद १३१; एल. आय. मेरिवाला १/३०)