Vijay Hazare Trophy 2018-19 : युवा पृथ्वी शॉ आणि कर्णधार श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीमुळे मुंबईने पावसाने व्यत्यय आणलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात हैदराबादचा ६० धावांनी पराभव करत विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. मुंबईचा हा सलग नववा विजय ठरला. पृथ्वी, रोहित शर्मा, रहाणे आणि श्रेयस या दमदार फलंदाजांमुळे या सामन्यात मुंबईचेच पारडे जड होते. २००६-०७ पासून मुंबईला एकदाही विजय हजारे कंरडकावर नाव कोरता आले नाही. २० ऑक्टोबर रोजी मुंबईचा अंतिम सामना दिल्ली आणि झारखंडमधील विजेत्यासोबत होणार आहे. गुरूवारी झारखंड आणि दिल्ली यांच्यामध्ये दुसरा उपांत्यसामना होणार आहे.

आज झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात मुंबईच्या तुषार देशपांडे आणि रॉयस्टन डायस यांच्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर हैदराबादच्या फलंदाजांना स्थिरावण्याचीही संधी दिली नाही. मात्र कर्णधार अंबाती रायुडूचा लहान भाऊ रोहित रायुडू याने दमदार १२१ धावांची नाबाद खेळी केल्यामुळे हैदराबादला ५० षटकांत ८ बाद २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. मुबईकडून तुषारने तीन तर रॉयस्टनने दोन विकेट्स मिळवल्या. हैदराबादचे २४७ धावांचे आव्हान पार करताना पृथ्वी शॉने सुरेख फलंदाजी करत ६१ धावांची खेळी केली. तिसऱ्या विकेटसाठी श्रेयस अय्यर आणि अिजक्य रहाणे यांनी ७३ धावांची अभेद्य भागीदारी रचली. मुंबईने २ बाद १५५ अशा स्थितीसह विजयाच्या दिशेने कूच करत असतानाच मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यानंतर पुन्हा दोन्ही संघ मैदानात उतरलेच नाहीत. त्यामुळे मुंबईला व्हीजेडी पद्धतीनुसार विजयी घोषित करण्यात आले.

हैदराबादचे आव्हान पार करताना पृथ्वी शॉ आणि रोहित शर्मा यांनी ७३ धावांची सलामी दिली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या राजकोट कसोटीत शतक झळकावून आपल्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या पृथ्वी शॉने हैदराबादच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. अवघ्या ४४ चेंडूंत त्याने ८ चौकार आणि २ षटकारांची आतषबाजी करत ६१ धावा फटकावल्या. पण रोहितपाठोपाठ (१७) पृथ्वीलाही मेहेदी हसनने त्रिफळाचीत करून माघारी पाठवले. त्यानंतर श्रेयस आणि रहाणे यांनी मुंबईचा डाव सावरून विजयाच्या दिशेने कूच केली. मुंबईला विजयासाठी ९१ धावांची आवश्यकता असताना पावसाचे आगमन झाले. पावसाने रौद्ररूप धारण केल्याने पुन्हा खेळ होऊ शकला नाही. त्यामुळे मुंबईने ६० धावांनी अंतिम फेरीत स्थान मिळवले.