नक्षलवादी चळवळीने पोखरलेल्या खुंती जिल्ह्य़ातील तोरपा या खेडेगावातील शेतकरी कुटुंबामध्ये जन्मलेल्या विनायक विक्रानने अनेक अडचणींवर मात करीत क्रिकेट कारकीर्द घडविली आहे. १९ वर्षांखालील स्थानिक स्पर्धामध्ये त्याने आपल्या प्रभावी फिरकीच्या जोरावर २४ बळी घेतले आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे (बीसीसीआय) आयोजित केलेल्या १९ वर्षांखालील स्पर्धामध्ये विनायकने केवळ पाच सामन्यांमध्ये दोन डझन बळी घेत निवड समितीचे लक्ष वेधून घेतले आहे.
झारखंड राज्य संघटनेने गतवर्षी घेतलेल्या १६ वर्षांखालील गटाच्या स्पर्धेसाठी झालेल्या निवड चाचणीत त्याने ४५ विकेट्स घेतल्या होत्या, तर त्याचा सहकारी दिवाकर झा याने ३३ बळी घेतले तरीही त्यांना झारखंडच्या संघात स्थान मिळाले नव्हते. यंदा मात्र संघात त्याला स्थान मिळाले व त्याचा फायदा घेत त्याने आपले कौशल्य सिद्ध केले.
भारतीय संघाचे माजी कर्णधार संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या तीन सदस्यांनी येथे तीन वर्षांपूर्वी नैपुण्य चाचणी घेतली होती. त्यामध्ये पहिल्यांदा विनायकच्या शैलीने
त्यांना प्रभावित केले होते. या समितीत ज्येष्ठ कसोटीपटू करसन घावरी
तसेच योगेंद्र पुरी यांचाही समावेश होता.
विनायकच्या गावात क्रिकेटसाठी फारशा सुविधा नाहीत तसेच त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थितीही बेताचीच आहे. मात्र क्रिकेटमध्ये कारकीर्द करण्याचेच त्याचे ध्येय आहे. पदार्पणाच्या सामन्यात त्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे त्यांच्या संघास २३ वर्षांखालील स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्ध विजय मिळविता आला. त्याने १९ वर्षांखालील गटाच्या आंतर विभागीय एकदिवसीय स्पर्धेत पूर्व विभागाचे प्रतिनिधित्व केले.   

रणजी स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्न करणार आहे व त्यानंतर भारतीय संघात स्थान मिळविण्याचे स्वप्न आहे.
– विनायक विक्रान