भारतीय कर्णधार विराट कोहली प्रत्येक सामन्यानंतर नवनवे विक्रम आपल्या नावे करत असतो. गुरूवारी आजपासून सुरू होणाऱ्या सामन्यात विराट कोहलीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडण्याची संधी असणार आहे. विराटला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त सहा धावांची गरज आहे.

विराट कोहलीला कसोटीमध्ये सहा हजार धावा करण्यासाठी फक्त सहा धावांची गरज आहे. कोहलीने आतापर्यंत ११८ डावांत ५९९४ धावा केल्या आहेत. तर सचिनने १२० डावांत सहा हजार धावा केल्या होत्या. धावा काढण्याच्या बाबतीत विराट सचिनच्या एक पाऊल पुढे आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. विराट कोहलीने चौथ्या कसोटीत सहा धावा काढताच सचिनचा आणखी एक विक्रम मोडणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात विराट सचिनचा हा विक्रम मोडेल असा विश्वास त्याच्या चाहत्यांना आहे.

सध्या सुरू असलेल्या कसोटी मालिकेत विराट कोहलीने सहा डावांत ४४० धावांचा डोंगर उभा केला आहे. या मालिकेत विराट विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. आतापर्यंत विराट कोहलीने ६९ कसोटी सामन्यातील ११८ डावांत फलंदाजी करताना २३ शतकांसह ५९९४ धावा केल्या आहेत. यादरम्यान विराट कोहलीची सरासरी ५५ आहे. कसोटीमध्ये विराट कोहलीची २४८ धावांची सर्वोत्तम खेळी आहे.

दरम्यान, पराभवांची मालिका खंडित करीत ट्रेंट ब्रिजवरील तिसरी कसोटी जिंकणारा भारतीय संघ गुरुवारपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटीत हे विजयी अभियान कायम राखण्यासाठी उत्सुक आहे. पहिल्या दोन कसोटी सामन्यांत मानहानीकारक पराभव पत्करल्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नॉटिंगहॅमच्या तिसऱ्या कसोटीत अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन करीत २०३ धावांनी दणदणीत विजय संपादन केला. मात्र तरीही भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-२ असा पिछाडीवर आहे.