भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू झाली आहे. काल मंगळवारी खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात भारताने इंग्लंडला 66 धावांनी मात दिली. भारतीय डावात विराट कोहलीने आपला चांगला फॉर्म कायम राखत अर्धशतक ठोकले. या अर्धशतकासह विराटने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे.

पुण्यात खेळल्या गेलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात विराटने आपले 61वे एकदिवसीय अर्धशतक पूर्ण केले. विराट आता सचिन तेंडुलकरनंतर घरच्या मैदानावर 10,000 आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. विराटने आपल्या 176व्या सामन्यात हा पराक्रम केला असून कोणत्याही फलंदाजाची आतापर्यंतची ही वेगवान कामगिरी आहे.

विराट कोहलीने आतापर्यंत 432 सामन्यात 55च्या सरासरीने 22689 आंतरराष्ट्रीय धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकर यात आघाडीवर आहे. सचिनने कारकीर्दीत 48च्या सरासरीने 664 सामन्यांत 34357 धावा केल्या आहेत.

जॅक कॅलिसलाही टाकले मागे

अर्धशतकी खेळी करताना विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू जॅक कॅलिसलाही मागे टाकले आहे. विराटने एकूण 104 एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावली आहेत, तर कॅलिसने 103 वेळा अशी कामगिरी केली आहे.

विराटला शतकाची आस

मार्क वूडच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी विराटने 60 चेंडूत 56 धावा केल्या. विराटने शिखर धवनबरोबर दुसर्‍या विकेटसाठी 105 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्याने आपल्या खेळीदरम्यान 6 चौकार लगावले. विराट पुन्हा एकदा शतक लगावण्यात अपयशी ठरला. 2019मध्ये बांगलादेशविरूद्ध डे-नाईट टेस्टमध्ये विराटने अखेरचे शतक केले होते. ऑगस्ट 2019मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने आपले शेवटचे एकदिवसीय शतक ठोकले होते.