बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात भारताने ८ गडी राखत विजय मिळवला. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्माच्या भारतीय संघाने १-१ अशी बरोबरीही साधली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात बांगलादेशने दिलेल्या १५४ धावांचा पाठलाग करताना भारताच्या रोहित-शिखर जोडीने शतकी भागीदारी करत विजयाच्या पाया रचला. रोहित शर्माने बांगलादेशी गोलंदाजांचा समाचार घेत ८५ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता. रोहितच्या या खेळीवर भारताचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग खुश झाला आहे.

अवश्य वाचा –  IND vs BAN : अर्धशतकी खेळीसह रोहित शर्माची सचिनशी बरोबरी

“सचिन आपल्या काळात सहकाऱ्यांना नेहमी म्हणायचा, जर एखादी गोष्ट मी करु शकतो तर तुम्ही का नाही? मात्र त्याला हे कधीच समजलं नाही की जे देवाला जमतं ते कोणालाही जमत नाही. रोहित सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिनसारखा खेळतोय. सध्या तो ज्या पद्धतीने खेळतोय त्याच्यासारखा खेळ कोणत्याही खेळाडूला जमणार नाही.” Cricbuzz संकेतस्थळाच्या एका कार्यक्रमात सेहवाग बोलत होता.

एका षटकात ३-४ षटकार ठोकायचे आणि ४५ चेंडूत ८०-९० धावा करायच्या ही एक कला आहे. विराट कोहलीलाही रोहितसारखं सातत्याने खेळ करणं जमणार नाही, सेहवागने रोहितच्या खेळाचं कौतुक केलं. रोहित शर्माला शिखर धवनने ३१ धावांची खेळी करत चांगली साथ दिली. दोन्ही खेळाडूंनी पहिल्या विकेटसाठी ११८ धावांची भागीदारी केली. या मालिकेतला अखेरचा सामना १० तारखेला नागपूरच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – IND vs BAN : माझी स्पर्धा माझ्याशीच ! रोहित शर्मा ठरतोय षटकारांचा बादशहा