माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंद याने अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याला बरोबरीत रोखले आणि नॉर्वे चषक बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्त रीत्या तिसरे स्थान राखले.
नाकामुरा या तुल्यबळ खेळाडूविरुद्धच्या लढतीत आनंदला काळ्या मोहरांनी खेळावयाचे होते. त्यामुळेच आनंदने हा डाव बरोबरीत ठेवण्यावरच भर दिला. आनंदने चौथ्या फेरीत विश्वविजेत्या मॅग्नस कार्लसन याच्यावर सनसनाटी विजय मिळविला होता. कालच्या विश्रांतीनंतर त्याने प्रथमपासूनच बचावात्मक पवित्रा घेतला होता. आनंदने या डावातील बरोबरीनंतर नेदरलँड्सच्या अनिष गिरी याच्या साथीत संयुक्त रीत्या तिसरे स्थान घेतले. त्यांचे प्रत्येकी तीन गुण झाले आहेत. गिरी याने फ्रान्सच्या मॅक्झिम व्हॅचिअर लाग्रेव्ह याला बरोबरीत रोखले.
बल्गेरियाच्या व्हॅसेलीन तोपालोव्ह याने साडेचार गुणांसह पाचव्या फेरीअखेर आघाडीस्थान मिळविले. स्थानिक खेळाडू जॉन लुडविग हॅमर याने बरोबरीकडे झुकलेल्या डावात केलेल्या अक्षम्य चुकांचा फायदा घेत तोपालोव्ह याने विजय मिळविला. नाकामुरा याचे साडेतीन गुण झाले आहेत. कार्लसन याला सूर गवसला. त्याने या स्पर्धेतील विजयाची बोहनी करताना रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुक (२) याला हरविले. त्याचा आता दीड गुण झाला आहे. लिवॉन आरोनियन याने इटलीच्या फॅबिआनो कारुआना याच्यावर शानदार विजय मिळविला. त्याचे आता दोन गुण झाले आहेत. कारुआना हा दोन गुणांवरच आहे.
नाकामुराविरुद्धच्या डावाविषयी आनंद म्हणाला, नाकामुरा हा पांढऱ्या मोहरांनी खेळत असल्यामुळे त्याचे पारडे थोडेसे जड होते त्यामुळेच मी कोणताही धोका न पत्करता बरोबरीसाठीच खेळलो. मी घोडय़ांच्या साहाय्याने केलेली व्यूहरचना खूपच प्रभावी ठरली. त्यामुळे नाकामुरा याच्या हत्तींच्या चाली असफल ठरल्या.
माझ्यासाठी रोजच योगदिन : आनंद
माझ्या खेळात एकाग्रतेस अनन्यसाधारण महत्त्व असल्यामुळे मी रोजच योगासने व ध्यानधारणा करीत असतो. त्यामुळे माझ्यासाठी रोजच योगदिन असतो. माझी काकू योगासनांमध्ये प्रवीण असल्यामुळे तिने योगाचे बाळकडू लहानपणीच दिले आहे,माझा खेळ बुद्धिचातुर्याचा असला, तरी माझ्यासाठीही शारीरिक तंदुरुस्ती महत्त्वाची आहे. जर शरीर तंदुरुस्त असेल, तर मनही तंदुरुस्त राहते, असे आनंदने सांगितले.