आइल ऑफ मॅन बुद्धिबळ स्पर्धा

ब्रिटन : माजी जगज्जेत्या विश्वनाथन आनंद चांगल्या कामगिरीसाठी धडपडत असून आइल ऑफ मॅन आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. सोमवारी रंगलेल्या अमेरिकेच्या रॉबर्ट हेसविरुद्धच्या सामन्यात आनंदने बरोबरी स्वीकारली.

१३ वर्षीय रौनक सधवानी याच्याविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात आनंद पराभवाच्या छायेत होता. मात्र हा सामना बरोबरीत सोडवण्यात आनंदने यश मिळवले. मात्र दुसऱ्या लढतीतही आनंदला फॉर्मसाठी झगडावे लागले. त्याने या सामन्यातही बचावात्मक पवित्रा अवलंबला. पांढऱ्या मोहऱ्यांनिशी फ्रेंच बचाव पद्धतीने खेळणाऱ्या आनंदला या सामन्यात फार काही करता आले नाही. हत्ती आणि प्याद्यांच्या चाली करण्यावर भर देणाऱ्या आनंद आणि हेसने ७८व्या चालीनंतर सामना बरोबरीत सोडवण्याचे मान्य केले.

या स्पर्धेत अनेक भारतीय बुद्धिबळपटू खेळत असून अनेक धक्कादायक निकालांची नोंद झाली. ग्रँडमास्टर व्ही. विष्णू प्रसन्ना याने आपल्यापेक्षा २०० गुणांनी वरचढ असलेल्या इस्रायलच्या तामिर नाबाती याच्यावर विजय मिळवला. हर्ष भारतकोटी याने आपल्यापेक्षा सरस असलेल्या एस. पी. सेतूरामन याच्यावर मात केली. हर्षने सुरुवातीपासूनच सेतूरामनच्या राजावर हल्ला चढवला. त्यामुळे सेतूरामनला आपल्या वजिराचा बळी द्यावा लागला. ही रणनीती हर्षसाठी फायदेशीर ठरली.

ग्रँडमास्टर विदित गुजराती यानेही भारताच्या देबाशिष दास याच्यावर मात केली. हंगेरीच्या पीटर लेको याला युवा ग्रँडमास्टर आर. प्रग्ननानंदा याचा अडथळा पार करता आला नाही. ही लढत बरोबरीत सुटली. प्रग्ननानंदा हिची बहीण वैशाली हिनेही माजी जागतिक विजेती रशियाची खेळाडू अलेक्झांड्रा कोस्तेनिउक हिला बरोबरीत रोखले.