हॉकी इंडिया लीग स्पर्धेत मुंबई मॅजिशिअन्सला पहिल्यावहिल्या विजयाची प्रतीक्षा आहे. आता त्यांचा मुकाबला उत्तर प्रदेश विझार्ड्स संघाशी होणार आहे. घरच्या मैदानावरच्या तिसऱ्या सामन्यात तरी मॅजिशिअन्सला विजय मिळवता येतो का हे बघणे रंजक ठरणार आहे.
गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या या दोन संघांत होणाऱ्या या मुकाबल्यात मुंबईला पहिल्या विजयासाठी चांगली संधी आहे. रिक चार्ल्सवर्थ या मान्यवर प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळणारा मॅजिशिअन्सचा संघ अद्यापही चाचपडताना दिसत आहेत. मॅजिशिअन्सला स्पर्धेआधीच धक्का बसला, कारण पाकिस्तानी खेळाडूंना विरोध झाल्यामुळे हे सर्व खेळाडू मायदेशी परत रवाना झाले. संघाच्या योजनांचा भाग असलेल्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे मॅजिशिअन्स चांगलेच गोंधळात पडल्याचे चित्र आहे.
शेवटच्या सामन्यात रांची ऱ्हिनोजकडून १-२ असा पराभव झाल्याने उपांत्य फेरी गाठण्याच्या त्यांच्या आशा धूसर झाल्या आहेत. आतापर्यंतच्या खेळलेल्या सातपैकी सातही सामन्यांत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असले तरी सहभागाचे गुण मिळाल्यामुळे त्यांचे सात गुण झाले आहेत. उर्वरित सामन्यांमध्ये दिमाखदार विजय मिळवल्यास मॅजिशिअन्स आपली जादू दाखवू शकतात. पेनल्टी कॉर्नर विशेषज्ञ व्ही. रघुनाथ यांच्यावर विझार्ड्सची मोठी भिस्त आहे. दक्षिण आफ्रिकेचा नोरिस जोन्सकडून विझार्ड्ला मोठी अपेक्षा आहे