हाँगकाँगविरुद्धच्या शतकी खेळीनंतर धवनचे मत

माझा फॉर्म अद्यापही कायम असून फक्त गेल्या काही सामन्यांत माझ्या बॅटमधून धावा होत नव्हत्या, अशी प्रतिक्रिया भारताचा सलामीवीर शिखर धवनने व्यक्त केली.

आशिया चषकातील पहिल्या सामन्यात धवनने १२७ धावांची खेळी साकारत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याच्या या खेळीमुळेच त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.

धवन म्हणाला, ‘‘माझ्या फलंदाजीच्या फॉर्माची मला कधीच चिंता नव्हती. मी चांगली फलंदाजीही करत होतो, मात्र माझ्या बॅटमधून मोठय़ा खेळी साकारण्यात अपयश येत होते. इंग्लंडविरुद्ध मी संघर्ष केला हे मान्य आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी माझा फॉर्म गमावला.’’

याव्यतिरिक्त, धवनने संघसहकाऱ्यांचा बचावही केला. तो म्हणाला, ‘‘सामन्यात हाँगकाँगने आम्हाला कडवी झुंज दिली. मात्र आम्हीही मानव असून कधी-कधी आमच्याही हातून चुका घडू शकतात. गेल्या अनेक वर्षांत आम्ही जितके सामने जिंकले आहेत तितकेच गमावलेही आहेत; पण या सामन्यात आम्ही हाँगकाँगकडून इतक्या प्रतिकाराची अपेक्षा केली नव्हती.’’

अंबाती रायुडू व खलील अहमद यांनी केलेल्या कामगिरीचेही धवनने कौतुक करताना संघाला पुढील सामन्यातही त्यांच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा आहे, असे सांगितले.