विजयासाठी दोन चेंडूंत ९ धावांची आवश्यकता.. समोर वेस्ट इंडिजचा ११वा फलंदाज जेसन होल्डर असल्याने पाकिस्तानच्या गटात थोडेसे आनंदाचे वातावरण होते.. पण अखेरच्या षटकातील पाचव्या चेंडूवर जेसनने षटकार खेचल्यावर मात्र पाकिस्तानची चिंता आणखी वाढली.. पाकिस्तानचे सर्व खेळाडू गोलंदाज वहाब रियाझला मार्गदर्शन करत होते.. त्याने अखेरचा चेंडू टाकण्यासाठी धावायला सुरुवात केली तेव्हा वातावरणात कमालीचा तणाव होता. कारण या एका चेंडूवर विजय आणि पराभवाचे माप कोणाकडे झुकणार हे ठरणार होते. वहाबचा चेंडू होल्डरच्या बॅटची कडा घेऊन ‘थर्ड मॅन’ला गेला, त्याने धावत दोन धावा काढल्या आणि सामना बरोबरीत सोडवला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानच्या २२९ धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने होल्डरच्या बळावर सामना बरोबरीत राखला.
प्रथम फलंदाजी करताना कर्णधार मिसबाह-उल-हकच्या (७५) अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तानला २२९ धावा करता आल्या.
लिन्डेल सिमॉन्सच्या (७५) अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजने आव्हान जिवंत ठेवले होते खरे, पण तो बाद झाल्यावर होल्डरने (नाबाद १९) अखेरच्या चेंडूत हाणामारी करत संघाला पराभवापासून दूर लोटले.