भारताच्या दोन जागतिक पदकांची निश्चिती

पीटीआय, ईकॅटरिनबर्ग (रशिया)

अमित पांघल (५२ किलो) आणि मनीष कौशिक (६३ किलो) यांनी बुधवारी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारून पुरुषांच्या जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेतील दोन पदकांची निश्चिती केली आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धा आणि आशियाई अजिंक्यपद स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या अमितने फिलिपिनो कार्लो पालमचा ४-१ असा पराभव केला, तर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या मनीषने ब्राझीलच्या वाँडरसन डी ऑलिव्हिराचा ५-० धुव्वा उडवला.

९१ किलो गटात इंडिया खुल्या बॉक्सिंग स्पर्धेतील माजी सुवर्णपदक विजेत्या संजीतला पराभव पत्करावा लागला. उपांत्य सामन्यात इक्वेडरच्या सातव्या मानांकित ज्युलिओ कॅस्टिलो टोरेसने संजीतला ४-१ असे नामोहरम केले.

आतापर्यंत जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने एकाहून अधिक पदक कधीच मिळवलेले नाही. भारताकडून विजेंदर सिंग (२००९), विकास कृष्णन (२०११), शिवा थापा (२०१५) आणि गौरव बिदुरी यांनी कांस्यपदके जिंकली आहेत.

द्वितीय मानांकित अमितने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात पालमला पराभूत केले होते. सेनादलात कार्यरत असणाऱ्या रोहटकच्या अमितने अखेरच्या दोन फेऱ्यांमध्ये आक्रमक खेळाचे प्रदर्शन केले. गेल्या जागतिक स्पर्धेत अमितने उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती.

माजी राष्ट्रीय विजेत्या मनीषची क्युबाच्या अग्रमानांकित अँडी गोमेझ क्रूझशी सामना होणार आहे. क्रूझने रशियाच्या आठव्या मानांकित पोपोव्हला नमवले. क्रूझने २०१७च्या जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.

मी सुरुवात धीम्या गतीने केली. परंतु दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत वर्चस्व गाजवले. प्रशिक्षकांनी दिलेला आक्रमकतेचा सल्ला मोलाचा ठरला. पालमविरुद्ध आधीसुद्धा मी सामना केला असल्याने तो अनुभव उपयुक्त ठरला.

– अमित पांघल