वर्ल्ड कपमध्ये आपल्या संथ खेळीमुळे टीकेचा धनी झालेल्या भारतीय संघाचा माजी कर्णधार एम एन धोनीची विराट कोहलीकडून पाठराखण करण्यात आली आहे. धोनी एक महान खेळाडू असल्याचं विराट कोहलीने म्हटलं आहे. ‘धोनी एक महान खेळाडू असून, त्याला खेळाची उत्तम जाण आहे. त्याच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघाला होत असल्याचं’, विराट कोहलीने सांगितलं आहे.

वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानच्या फिरकी गोलंदाजांविरोधात केलेल्या संथ खेळीमुळे धोनीवर प्रचंड टीका झाली होती. यानंतर गुरुवारी झालेल्या वेस्ट इंडिज संघाविरोधातही धोनी अत्यंत धीम्या गतीने धावा करत होता. अखेरच्या षटकात १६ धावा करत केल्याने त्याची धावसंख्या ६१ चेंडूत ५६ धावा झाली होती. भारताने वेस्ट इंडिजसमोर २६८ धावांचं लक्ष्य दिलं होतं.

‘मधल्या फळीत खेळताना नेमकं काय करायचं आहे याची धोनीला योग्य माहिती आहे. एखाद्या दिवशी जेव्हा तो खेळत नाही तेव्हा प्रत्येकजण चर्चा करण्यास सुरुवात करतं. मात्र आमचा नेहमी त्याला पाठिंबा असतो. त्याने आम्हाला अनेक सामने जिंकून दिले आहेत’, असं विराट कोहलीने म्हटलं आहे. वेस्ट इंडिजचा १२५ धावांनी दणदणीत पराभव केल्यानंतर विराट कोहलीने प्रसारमाध्यमांसी संवाद साधला.

‘धोनीसारखा खेळाडू सोबत असण्याची सर्वोत्तम गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्हाला १५ ते २० धावांची गरज असते तेव्हा त्या कशा मिळवायच्या हे त्याला अगदी योग्य माहिती आहे. त्याचा अनुभव १० पैकी ८ वेळा यश मिळवून देतो’, असं विराटने सांगितलं आहे.

भारत अजिंक्यच! कॅरेबियन वादळ मात्र शमलं…

पुढे बोलताना त्याने सांगितलं की, ‘संघात असे अनेक खेळाडू आहेत जे संघाला गरज आहे त्यानुसार खेळ करतात आणि आपला गेम प्लान फॉलो करतात. धोनीला क्रिकेटची उत्तम जाण आहे. तो नेहमी आम्हाला सल्ला देत असतो. तो एक महान खेळाडू आहे आणि आम्हा सर्वांना हे माहिती आहे’.

भारतीय संघाने आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं असल्याच्या प्रश्नावर बोलताना विराटने सांगितलं की, ‘मी तक्रार करु शकत नाही. आम्ही नुकतेच पहिल्या क्रमांकावर आलो आहोत. खरं सांगायचं तर आम्ही गेल्या अनेक काळापासून चांगला खेळ करत असून पुढेही करणं गरजेचं आहे. फलंदाजीच्या बाबतीत गेल्या दोन सामन्यात आम्ही चांगला खेळ करु शकलो नाही, पण तरीही विजय मिळवला ही सुखावणारी गोष्ट आहे’.

‘मी नेहमी माझ्या पद्दतीने खेळतो. एक आणि दोन धावा घेण्यात मला आनंद आहे. याचा एकदिवसीय क्रिकेटमध्ये खूप फरक पडतो. विजयात दिलेल्या योगदानाबद्दल मी आनंदी असून भविष्यातही देण्याचा प्रयत्न करत राहीन’, असं विराटने सांगितलं. यावेळी विराट कोहलीने हार्दिक पंड्याचंही कौतुक केलं.

‘हार्दिक खूप चांगला खेळला आणि धोनीने योग्य शेवट केला. जेव्हा हे दोघं त्यांच्या पद्दतीने खेळतात संघाला चांगली धावसंख्या उभारण्यात मदत मिळते. मला माझ्या फलंदाजांना काही सांगण्याची गरज नाही. ते आपल्या क्षमतेप्रमाणे योग्य खेळी करत आहेत’, असंही विराटने यावेळी सांगितलं.