जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाने रौप्य पदक पटकावले आहे. ६५ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत पराभव झाल्याने पुनियाचे सुवर्णपदकाचे स्वप्न भंगले. मात्र, या रौप्य पदकासह मानाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत दोन पदकं पटकावणारा पुनिया हा पहिला भारतीय कुस्तीपटू ठरला आहे.

२०१३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या बजरंगला आपले कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी लागला. ६५ किलो वजनी गटात त्याच्यावर भारताची भिस्त होती. पुनियानेही चांगली कामगिरी करत अंतिम फेरीत प्रवेश केला. राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेत त्याने ज्या सहजतेने सुवर्णपदक पटकावले, त्यामुळे या स्पर्धेतही तो पदकासाठी दावेदार मानला जात होता. अंतिम फेरीत त्याचा सामना जपानच्या मल्लाशी होता. या सामन्यात ताकुटो ओटुगारोने पुनियाचा १६- ९ ने पराभव केला आणि पुनियाचे सुवर्ण पदकाचे स्वप्न भंगले.

दरम्यान, भारताकडून आतापर्यंत सुशिल कुमारने जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. २०१० साली मॉस्को येथे झालेल्या स्पर्धेत ६६ किलो वजनी गटात सुशीलने सुवर्णपदक पटकावलं होतं. यंदाच्या जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेसाठी भारताच्या ३० जणांच्या पथकाचे नेतृत्व सोपविण्यात आले होते.