भारताचा कुस्तीपटू संदीप तोमरने पहिल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पध्रेत पुरुषांच्या ५७ किलो फ्री स्टाईल प्रकारात कांस्यपदकाची कमाई करून रिओ ऑलिम्पिक पात्रता निश्चित केली आहे. २५ वर्षीय संदीप हा रिओवारी पक्की करणारा चौथा भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. याआधी योगेश्वर दत्त (६५ किलो फ्री स्टाईल), नरसिंग यादव (७४ किलो फ्री स्टाईल) आणि हरदीप सिंग (ग्रिको-रोमन ९८ किलो) यांनी गतवर्षी ऑलिम्पिक प्रवेश निश्चित केला होता. कांस्यपदक पटकावल्यानंतर संदीपने तिसऱ्या क्रमांकासाठीच्या लढतीत विजय मिळवत ही किमया साधली.

‘ऑलिम्पिकवारी मिळवल्याचा आनंद शब्दात सांगणे कठीण आहे. या ध्येयासाठी घेतलेल्या मेहनतीचे फळ मला मिळाले,’ अशी प्रतिक्रिया संदीपने दिली.

तो पुढे म्हणाला, ‘आजच्या सामन्यात चांगली सुरुवात झाली. प्रतिस्पर्धीला व्यस्त ठेवल्यास विजयाची चांगली संधी मिळेल, याची जाण होती. आता सर्व लक्ष ऑलिम्पिकवर केंद्रित करायचे आहे आणि पुढील तीन महिने अतिमहत्त्वाचे आहेत.’

Untitled-9