पाकिस्तान म्हणजे हिंसा, दहशतवाद आणि अस्थिर वातावरण, असे चित्र पाहायला मिळते. २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेटपटूंवर झालेला हल्ला माणुसकीला काळिमा फासणारा होता. सुदैवाने या हल्ल्यात क्रिकेटपटूंसह, पंच आणि सामनाधिकारी वाचले, मात्र या घटनेचे व्रण पुसले गेले नाहीत. या घटनेनंतर अन्य संघांनी पाकिस्तानचा दौरा करणे बंद केले. सहा वर्षांनंतर पाकिस्तानमधली परिस्थिती बदललेली नाही, मात्र झिम्बाब्वेच्या संघाने पाकिस्तानचा दौरा करण्याचे निश्चित केले आहे. झिम्बाब्वे संघाच्या निर्णयामुळे पाकिस्तानच्या संघाची घरवापसी होणार असून, तब्बल सहा वर्षांनंतर त्यांना घरच्या मैदानांवर, प्रेक्षकांच्या पाठिंब्यासमोर खेळता येणार आहे.
या सहा वर्षांमध्ये पाकिस्तान यजमान असलेल्या मालिका दुबई किंवा अबुधाबी येथे आयोजित करण्यात येत होत्या. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष शहरियार खान यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. झिम्बाब्वेचा संघ एका आठवडय़ासाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्याचे स्वरूप आणि मैदाने अद्याप निश्चित झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. पण लाहोरच्या गडाफी स्टेडियमवर काही सामने आयोजित होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. संवेदनशील कराची शहरात काही सामने आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे. मात्र कराचीच्या प्रसिद्ध नॅशनल स्टेडियम परिसरात सुरक्षेचा प्रश्न असल्याने हे सामने शहराच्या बाहेर असणाऱ्या अरेबियन कंट्री क्लब किंवा साऊथ एन्ड क्लब या ठिकाणी आयोजित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
‘‘झिम्बाब्वे संघाला कमीत कमी प्रवास करावा लागेल, असा आमचा प्रयत्न आहे. लाहोर आणि कराचीतील या ठिकाणी मैदानाच्या नजीकच राहण्याची व्यवस्था आहे. सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी झिम्बाब्वेचे शिष्टमंडळ या आठवडय़ात पाकिस्तानात येणार असून, त्यानंतर दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात येईल,’’ असे खान यांनी पुढे सांगितले.
दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव अन्य देशांचे पंच आणि सामनाधिकारी पाकिस्तानचा दौरा करण्यास तयार नसल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पीसाबीला झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेसाठी विशेष बाब म्हणून स्थानिक पंच आणि सामनाधिकाऱ्यांना अनुमती दिली आहे. आयसीसीच्या नियमाप्रमाणे एकदिवसीय सामन्यांकरिता एक तटस्थ पंच आणि सामनाधिकारी असणे अनिवार्य असते. मात्र पाकिस्तानमधील परिस्थिती लक्षात घेऊन, आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. या मालिकेतील सामन्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा असणार असल्याचेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.