जागतिक क्रमवारीतील अव्वल मानांकित इंग्लंडच्या टेनिसपटू अँडी मरे याच्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्याचे स्वप्न रविवारी संपुष्टात आले. अँडी मरे याला स्पर्धेच्या चौथ्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला. जागतिक क्रमवारीतील ५० व्या मानांकित जर्मनीच्या मिशा झ्वेरेव्हने अँडी मरेला पराभवाचा धक्का दिला. झ्वेरेव्हने आपल्या सर्वोत्तम कामगिराचा नजराणा पेश करत तब्बल साडेतीन तास रंगलेल्या या सामन्यात मरेवर ५-७, ७-५, २-६, ४-६ अशा सेटमध्ये विजय मिळवला.

खरं सांगतो, मी अजूनही धक्क्यातच आहे. मी फक्त माझा खेळ करत गेलो. जास्तीत जास्त चांगली कामगिरी करण्यावर मी भर देत आहे, असे झ्वेरेव्हने मरेवर मात केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हटले. पुढील फेरीत टेनिसस्टार रॉजर फेडरर आणि निशिकोरी यांच्यातील विजेत्या टेनिसपटूचे आव्हान झ्वेरेव्हच्या समोर असणार आहे.

मरेविरुद्धच्या सामन्यात काही महत्त्वाचे क्षण नक्कीच आहेत. मी कसा जिंकलो मला माहित नाही. पण मी खूप उत्सुक होतो. उपस्थित प्रेक्षकांनीही छान साथ दिली, असेही झ्वेरेव्ह पुढे म्हणाला.

वाचा: ऑस्ट्रेलियन ओपनच्या दुसऱ्याच फेरीत जोकोव्हिचला पराभवाचा धक्का

दरम्यान, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये यंदा धक्कादायक निकाल पाहायला मिळत आहेत. मरेचा चौथ्या फेरतीच पराभवाचा धक्का बसला तर त्याआधी सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिच याचा स्पर्धेच्या दुसऱयाच फेरीत पराभव झाला. जोकोव्हिच याला जागतिक क्रमवारीतील ११७ व्या मानांकित खेळाडूकडून पराभवाला सामोरे जावे लागले.