गुरमेहर कौरच्या प्रकरणावरून टीकेचे केंद्रस्थान झालेल्या भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने आपले स्पष्टीकरण दिल्यानंतरही त्याच्यावर होणारी टीका काही थांबताना दिसत नाही. वीरूने पुन्हा एकदा गुरमेहर कौर प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट करणारे ट्विट करून सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. गुरमेहरला बलात्काराच्या आणि मारहाणीच्या धमक्या देणारे भेकड आहेत. यासोबतच मी केलेल्या ट्विटचा चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचेही सेहवागने म्हटले आहे.

वाचा: सेहवाग हा काही भारताचा प्रतिनिधी नाही; उमर खालिदचा हल्ला

वाचा: गुरमेहर कौर प्रकरणात गंभीरची उडी, सेहवागवर ‘बाऊन्सर’?

गुरमेहर कौरच्या फेसबुक पोस्टवरून वीरूने आपल्या हजरजबाबी वृत्तीचे दर्शन घडवत केलेले ट्विट त्याला महागात पडले होते. आपण केलेल्या ट्विटचा गुरमेहर प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याची भूमिका त्यानंतर वीरूने जाहीर केले होती. देशात सध्या गुरमेहरच्या पोस्टचे प्रकरण चांगले तापले असून काही जण गुरमेहरच्या बाजूने तर काही विरोधात आपली मतं व्यक्त करत आहेत. अभिनेता रणदीप हुडापाठोपाठ कुस्तीपटू योगेश्वर दत्त, बबीता फोगट यांनी गुरमेहरला देण्यात आलेल्या धमकीचा निषेध व्यक्त केला. गुरमेहरला देण्यात येणाऱया बलात्काराच्या धमक्यांचा मी तीव्र निषेध व्यक्त करते. देशात अशा बेधडक धमक्या दिल्या जात असतील तर हे धोकादायक आणि निंदनीय आहे, असे ट्विट बबीता फोगटने केले आहे. तसेच योगेश्वर दत्तने देखील गुरमेहर प्रकरणावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. मी गुरमेहरच्या विरोधात नसून मी तिचा सन्मान करतो. ती शहीद जवानाची मुलगी आहे. पण माजे विचार तिच्यापेक्षा वेगळे आहेत, असे ट्विट योगेश्वरने केले आहे.