साखळी फेरीतील दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ८ गडी राखून सहज विजय मिळवला. पाकिस्तानने विजयासाठी दिलेले १६३ धावांचे माफक आव्हान भारतीय फलंदाजांनी पार केले आणि साखळी फेरीत गटात अव्वल स्थान राखले. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी केली, त्याला सलामीवीर शिखर धवनने ४६ धावा काढून चांगली साथ दिली. या सलामीवीरांच्या बळावर भारताने हा सामना जिंकला. भारताचा पाकिस्तानवरील प्रत्येक विजय हा सुखावणाराच असतो. पण काल सामन्यातील आणखी एक क्षण दोनही चाहत्यांना सुखावणारा होता.

भारताचा फिरकीपटू युझवेन्द्र चहल याने पाकिस्तानी खेळाडूच्या बुटाची लेस बांधली आणि या एका क्षणाने नेटिझन्सनी मनं जिंकली. पाकिस्तानी फलंदाजाला धाव घेण्यासाठी अडचण येत होती. त्यामुळे त्याने चहलला त्याच्या बुटाची लेस बांधण्यास विनंती केली. चहलने क्षणाचाही विलंब न लावता पटकन खाली वाकून त्याच्या बुटाची लेस बांधली.

दरम्यान, या सामन्यात चहलला गडी बाद करता आला नाही. त्याने सात षटकात ३४ धावा खर्च केल्या. भुवनेश्वर कुमार आणि केदार जाधव यांच्या प्रत्येकी ३ बळींमुळे भारताने पाकिस्तानला १६२ धावांत गुंडाळले.