नवी दिल्ली : अचंता शरथ कमाल आणि जी. साथियन या भारताच्या पुरुष दुहेरी जोडीने बहारिनच्या जोडीवर एकतर्फी विजय मिळवत २४व्या ‘आयटीटीएफ’ आशियाई टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.

भारताच्या जोडीने महफूध सय्यद मुर्तधा आणि रशेद रशेद यांच्यावर ११-८, ११-६, ११-३ असा सहज विजय मिळवला. उपांत्यपूर्व फेरीत कमाल-साथियन जोडीला चीनच्या लियांग जिंगकुन आणि लिन गाओयुआन यांचा सामना करावा लागेल. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर कमाल-साथियन यांनी जॉर्डनच्या अबो यमान आणि अल्दमाझी झेयाद यांच्यावर ११-४, ११-७, ११-७ अशी मात केली होती.

हरमीत देसाई आणि अँथनी अमलराज यांना चायनीज तैपेईच्या लिऊ सिंग-यिन आणि पेंग वँग वेई यांच्याकडून ११-५, ७-११, ११-३, ८-११, ६-११ अशी हार पत्करावी लागली. मनिका बात्रा आणि अर्चना काम यांना दुसऱ्या फेरीत कोरियाच्या यँग हेऊन आणि जेओन झी यांनी ६-११, ९-११, ७-११ असे हरवले.

मधुरिका पाटकर आणि सुतिर्था मुखर्जी यांनाही दुसऱ्या फेरीत हाँगकाँगच्या डू होई केम आणि ली हो चिंग यांच्याकडून ९-११, ५-११, ११-१३ असे पराभूत व्हावे लागले.