ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत भारताने ४-१ असा विजय मिळवला. नागपूरच्या अखेरच्या वन-डे सामन्यात मुंबईकर रोहित शर्माने शतकी खेळी करुन भारताचा विजय सुकर केला. या सामन्यात भारताने तब्बल १३ विक्रमांची नोंद केली, त्यापैकी ७ विक्रम हे एकट्या रोहित शर्माच्या नावावर आहेत.

अवश्य वाचा – पांड्याला मागे टाकत रोहित सरस, ‘हे’ १३ विक्रम भारताच्या नावावर

कालच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या २४३ धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेने भारतीय डावाची आक्रमक सुरुवात केली. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. ज्यात रोहित शर्माने शतक तर अजिंक्य रहाणेने अर्धशतक झळकावत आपला मोलाचा हातभार लावला. कालच्या सामन्यात ८ व्या षटकामध्ये रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर दोन सुरेख चौकार लगावले. हे चौकार पाहिलेत की तुम्हाला सचिन तेंडुलकरची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.

या खेळीसाठी रोहित शर्माला सामनावीराचा किताब देऊन गौरवण्यात आलं. बंगळुरुच्या सामन्याचा अपवाद वगळता सर्व मालिकेवर भारतीय संघाने आपलं वर्चस्व गाजवलं. वन-डे मालिकेनंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेत भारतीय संघ पुन्हा ऑस्ट्रेलियाला मात देणार का हे पहावं लागणार आहे.

अवश्य वाचा – टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, अजिंक्य रहाणेला वगळलं