मॅथ्यू वेडच्या आक्रमक अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ५९ धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड वॉर्नरने ५९ धावांची खेळी केली. कर्णधार स्टीव्हन स्मिथने ४४ धावा केल्या. आदिल रशीदच्या भेदक माऱ्यामुळे ऑस्ट्रेलियाची ६ बाद १९३ अशी स्थिती होती मात्र त्यानंतर मॅथ्यू वेड आणि मिचेल मार्श यांनी सातव्या विकेटसाठी ११२ धावांची भागीदारी केली. वेडने १२ चौकारांसह ५० चेंडूत ७१ धावांची खेळी केली. मार्शने ३४ चेंडूत ४० धावा करत त्याला चांगली साथ दिली. रशीदने ४ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडने नियमित अंतरात विकेट्स गमावल्या. जेसन रॉयने सर्वाधिक ६७ धावा केल्या. इंग्लंडचा डाव २५६ धावांतच संपुष्टात आला. वेडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.