‘संयमी’ फेडरर उपांत्यपूर्व फेरीत

‘धीर धरी रे धीरापोटी मिळतील फळे रसाळ गोमटी’ हे तत्त्व डोळय़ांसमोर ठेवत गतविजेता स्वित्र्झलडच्या रॉजर फेडररने संयमी खेळाचा प्रत्यय घडवला आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. अनपेक्षित निकालांमुळे वैशिष्टय़पूर्ण ठरलेल्या शुक्रवारी दक्षिण कोरियाच्या चुंग हय़ुयोनने माजी विजेता सर्बियाच्या नोवाक जोकोव्हिचला पराभवाचा दणका दिला. टेनिस सँडग्रेनने पाचव्या मानांकित डॉमनिक थिएमला पराभूत करत आणखी एक सनसनाटी निकाल नोंदवला.

कारकीर्दीत १९ ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्या फेडरर याने पुरुष एकेरीमध्ये चौथ्या फेरीत हंगेरीच्या मार्टन फुक्सोव्हिक्स याचा ६-४, ७-६ (७-३), ६-२ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीत फेडररला टोमास बर्डिच या १९व्या मानांकित खेळाडूशी दोन हात करावे लागणार आहेत. बर्डिच याने इटलीच्या फॅबिओ फोग्निनी याचा

६-१, ६-४, ६-४ असा सहज पराभव केला.

१४वा मानांकित जोकोव्हिच याला चुंगने ७-६ (७-४), ७-५, ७-६ (७-३) असे हरवले. या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरी गाठणारा चुंग हा कोरियाचा पहिला खेळाडू आहे. सॅण्डग्रेन याने संघर्षपूर्ण लढतीनंतर थिएम याला ६-२, ४-६, ७-६ (७-४), ७-६ (९-७), ६-३ असे पराभूत केले.

फेडरर व जोकोव्हिच यांच्या सामन्यांबाबत कमालीची उत्कंठा निर्माण झाली होती. शांतचित्ताने खेळण्याबाबत ख्यातनाम असलेल्या फेडररने फुक्सोव्हिक्सविरुद्ध दोन तासांच्या खेळात फोरहँड व बॅकहँडच्या बहारदार फटक्यांचा सुरेख खेळ केला. तसेच त्याने व्हॉलीजचाही कल्पकतेने उपयोग केला. दुसऱ्या सेटमध्ये त्याला झुंजावे लागले. तथापि, फेडररने  टायब्रेकरमध्ये वर्चस्व राखताना सामना जिंकला. द्वितीय मानांकित फेडरर याने पाच वेळा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेचे अजिंक्यपद पटकावले आहे.

जोकोव्हिचने सहा वेळा मेलबर्न पार्कवर चषक उंचावला आहे. मात्र २००७नंतर पुन्हा एकदा त्याचे आव्हान चौथ्या फेरीतच संपुष्टात आले. मागील वर्षी जोकोव्हिचला दुसऱ्या फेरीतच बाहेरचा रस्ता धरावा लागला होता.

पुरुष दुहेरीत बोपण्णा व शरन पराभूत

भारताच्या रोहन बोपण्णा व दिविज शरन यांना ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. बोपण्णा हा एडवर्ड रॉजर व्हॅसेलिनसह या स्पर्धेत खेळत आहे. शरण याने अमेरिकन खेळाडू राजीव रामसह स्पर्धेत भाग घेतला आहे.

बोपण्णा व व्हॅसेलिन यांना ऑलिव्हर मराच (ऑस्ट्रिया) व मॅट पेव्हिक (क्रोएशिया) यांनी ४-६, ७-६ (७-५), ६-३ असे हरवले. हा सामना दोन तास चालला होता. लुकाझ क्युबोट (पोलंड) व मार्सेलो मिलो (ब्राझील) यांनी शरन व राम यांचे आव्हान ३-६, ७-६ (७-४), ६-४ असे संपुष्टात आणले. हा सामना सव्वादोन तास चालला.

पूर्णपणे तंदुरुस्त नव्हतो

दुखापतीमुळे सहा महिने मी स्पर्धात्मक सरावापासून वंचित होतो. त्यानंतर येथील स्पर्धेद्वारे मी पुनरागमन केले होते. मात्र शंभर टक्के तंदुरुस्त नव्हतो. तरीही चौथ्या फेरीपर्यंत मजल गाठली. ही माझ्यासाठी खूप चांगली कामगिरी आहे. चुंग हा नैपुण्यवान खेळाडू आहे. त्याने सुरेख खेळ केला. माझा खेळ अपेक्षेनुसार झाला नाही, असे जोकोव्हिचने सांगितले.

विश्वासच बसत नाही

जोकोव्हिच हा माझ्यासाठी प्रेरणास्थान आहे. त्याच्या शैलीसारखीच मी शैली विकसित केली आहे. त्याच्यावर मी सरळ तीन सेटमध्ये मात करू शकलो, यावर विश्वासच बसत नाही. जोकोव्हिचविरुद्धच्या लढतीसाठी थोडी पूर्वतयारी केली होती. तरीही नैसर्गिक खेळ करण्यावर भर दिला. अपेक्षेनुसार माझा खेळ झाला.जोकोव्हिचकडून भरपूर चुका झाल्या. त्याचाही मला फायदा मिळाला. माझा खेळ पाहण्यासाठी माझे मूठभर चाहते उपस्थित होते, तर बहुतांश प्रेक्षकांचा जोकोव्हिच याला पाठिंबा होता. मात्र मी त्याकडे दुर्लक्ष केले व खेळत राहिलो. त्यामुळेच स्वप्नवत कामगिरी करू शकलो, असे चुंग याने सांगितले.

  • ३६ जिमी कॉनर्स (३९ वय) यांच्यानंतर ग्रँड स्लॅम स्पध्रेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणारा
  • ३६ वर्षीय फेडरर हा वयस्कर खेळाडू ठरला. कॉनर्स यांनी १९९१च्या अमेरिकन खुल्या स्पध्रेत हा विक्रम केला होता.
  • १४ फेडरर १४व्यांदा ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत
  • ५२ कारकीर्दीतील ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धात ५२व्यांदा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश
  • ९१ फुस्कोविक्सवरील विजय हा त्याचा मेलबर्न पार्कवरील ९१वा विजय

अपेक्षेपेक्षा सहज विजय

माझा प्रतिस्पर्धी फुक्सोव्हिक्स लढवय्या खेळाडू आहे. त्यामुळे विजय मिळवताना पाच सेटपर्यंत लढत द्यावी लागेल, असे मला वाटले होते. तथापि, अपेक्षेपेक्षा मला खूपच सहज विजय मिळाला. विजयी वाटचाल राखण्यात यश मिळाल्याचे मला समाधान वाटते. टोमास बर्डिच याच्याविरुद्ध जिंकण्यासाठी मला हा विजय महत्त्वाचा आहे. बर्डिच हा धोकादायक खेळाडू आहे.

रॉजर फेडरर.