scorecardresearch

रविवार विशेष : तिची निवृत्तीगाथा!

करोनानंतर कोणताही खेळ असो, जगभरातील सर्वच खेळाडूंना जैव-सुरक्षित परिघात राहावे लागते.

|| संदीप कदम

खेळाडूंच्या कारकीर्दीतील पंचविशी हा बहरण्याचा काळ. हे वय निवृत्तीचे मुळीच नसते; पण टेनिसविश्वातील एका घटनेने सर्वाना दखल घ्यायला लावली. तीन ग्रँडस्लॅम विजेती ऑस्ट्रेलियन खेळाडू अ‍ॅश्ले बार्टीने निवृत्तीचा तडकाफडकी निर्णय घेतला. दोन महिन्यांपूर्वीच बार्टीने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवले होते. त्यामुळे बार्टीची यशोगाथा चर्चेत असताना ही ‘निवृत्तीगाथा’ क्रीडा क्षेत्रासाठी धक्कादायक ठरली. बार्टी आपल्या कारकीर्दीतील सर्वोच्च शिखरावर होती. महिला एकेरीच्या जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणाऱ्या बार्टीला निवृत्ती का घ्यावीशी वाटली? करोना साथीतून सावरत असताना बदललेल्या जीवनशैलीत याचे उत्तर दडले आहे.

करोनानंतर कोणताही खेळ असो, जगभरातील सर्वच खेळाडूंना जैव-सुरक्षित परिघात राहावे लागते. त्यांना एकाच दैनंदिन कार्यक्रमाचा अवलंब करावा लागतो. जे काही करायचे ते आखून दिलेल्या चौकटीत राहून करावे लागते. अनेक खेळाडूंनी या परिघात राहणे सोपे नसल्याचे म्हटले आहे. बार्टीने निवृत्ती घेताना आपल्याला खेळण्यासाठी म्हणावी तशी ऊर्जा शिल्लक राहिली नाही, असे म्हटले होते. ‘‘टेनिसपटू म्हणून सर्वोच्च स्तरावर कामगिरी करण्यासाठी शारीरिक व मानसिकदृष्टय़ा स्वत:ला झोकून देणे गरजेचे असते. मात्र, माझ्यात आवश्यक ती ऊर्जा शिल्लक राहिलेली नाही. टेनिसपासून दूर जाण्यासाठी ही योग्य वेळ असल्याचे मनापासून वाटत आहे. यासोबत जीवनातील इतर गोष्टींवर लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहे,’’ असे बार्टीने समाजमाध्यमांवरील आपल्या निवृत्तीच्या भाषणात म्हटले आहे.

बार्टीने गोल्फपटू गॅरी किसीकशी साखरपुडा केला असून ती आपल्या आयुष्याच्या नवीन अध्यायाला सुरुवात करणार आहे. सेरेना विलियम्सचे वलय महिला एकेरीतून जसे कमी झाले. तसे जेतेपद मिळवणाऱ्या महिला टेनिसपटूंच्या यादीत नवीन खेळाडूंची भर पडत गेली. त्यापैकी एक म्हणजे बार्टी. २०१९ मध्ये तिने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ते तिच्या कारकीर्दीतील पहिलेवहिले ग्रँडस्लॅम जेतेपद. यानंतर तिने विम्बल्डन (२०२१) आणि ऑस्ट्रेलियन (२०२२) या स्पर्धा जिंकल्या. यापैकी ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम स्पर्धेचे यश तिच्यासाठी ऐतिहासिक ठरले. कारण १९७८ मध्ये क्रिस ओ’नीलनंतर तब्बल ४४ वर्षांनी ऑस्ट्रेलियाच्या टेनिसपटूने मायदेशात हा पराक्रम दाखवला. याशिवाय बार्टीने सलग ११४ आठवडे टेनिसमधील अग्रस्थान टिकवले आहे. तसेच स्टेफी ग्राफ, मार्टिना नवरातिलोव्हा, सेरेना विलियम्स आणि ख्रिस एवर्ट या खेळाडूंच्या पंक्तीत जाऊन ती बसली. बार्टी २०२० मध्ये फ्रेंच खुली स्पर्धा जिंकण्यासाठी पुन्हा सज्ज झाली; पण करोनाच्या भीतीने तिने माघार घेतली आणि आपले लक्ष गोल्फकडे वळवले. या खेळातसुद्धा बार्टीने आपले प्रावीण्य दाखवले. ब्रूकवॉटर गोल्फ क्लबच्या महिला गटाचे तिने जेतेपद मिळवले.

बार्टीने बालपणी ब्रिस्बेन येथून टेनिसला प्रारंभ केला. वयाच्या १२व्या वर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धेच्या सराव शिबिरात जाण्याची संधी तिला मिळाली आणि तेथूनच खेळाबाबतचे तिचे खेळाविषयीचे आकर्षण आणखी वाढले. व्यावसायिक टेनिसमधील खेळाडूंचा खेळ पाहून ती भारावली. त्यातूनच धडे घेत ती या स्पर्धेच्या कनिष्ठ गटात सहभागी झाली. मग दिवसांगणिक बार्टीचा टेनिसमधील यशोआलेख उंचावत गेला.

तशी बार्टीची टेनिसला अलविदा करण्याची ही पहिलीच वेळ नाही. २०११ मध्ये १५व्या वर्षी तिने विम्बल्डनच्या कनिष्ठ गटाचे जेतेपद मिळवले. मात्र, दोन वर्षांनी प्रवासामुळे आलेला थकवा आणि अपेक्षांच्या ओझ्यामुळे ती टेनिसपासून दूर गेली. यानंतर तिने आपला मोर्चा क्रिकेटकडे वळवला. महिलांच्या बिग बॅश लीग क्रिकेटमध्ये ब्रिस्बेन हिट संघाचे तिने प्रतिनिधित्व केले; पण पुन्हा एकदा ती टेनिसकडे वळली.

पण टेनिसमध्ये बार्टी सर्वाधिक रमली. या खेळात जागतिक स्तरावर तिने नावलौकिक मिळवला. मात्र तरीदेखील तिचे पाय जमिनीवर आहेत. कोणत्याही खेळाडूला कधी ना कधी निवृत्ती घ्यावी लागते; पण कारकीर्द ऐन भरात असताना असा निर्णय घेण्यास धैर्य लागते. तेच बार्टीने दाखवून दिले आहे. ती आता पुढे काय करणार याबाबत स्पष्टता नाही. बार्टीकडे क्रिकेट आणि गोल्फ या दोन्ही खेळाडूंचे यश गाठीशी आहे. त्यामुळे टेनिसमधील निवृत्तीनंतर हे पर्यायसुद्धा तिच्यापुढे उपलब्ध आहेत. व्यावसायिक खेळातील सद्य:स्थितीतील आव्हानांमुळे निवृत्ती पत्करणारी बार्टी कुटुंबाकडे लक्ष देत इतिहासजमा होणार, की काही वर्षांनी नव्याने उमेदीने टेनिसमध्ये परतणार, याबाबत क्रीडा क्षेत्रात कमालीची उत्सुकता आहे.

 sandip. kadam@expressindia.Com

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Australian player ashleigh barty retires australian open tennis championships akp